
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्य शासनातर्फे दिला जाणारा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ बासरीवादक पंडित केशव गिंडे यांना घोषित झाला आहे. 5 लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली उस्मान खान, सदानंद नायमपल्ली, शाम गुंडाकार, भारती कैशंपायन, बाळ पुरोहित आणि शुभदा पराडकर यांच्या समितीने या पुरस्कारासाठी पंडित केशक गिंडे यांची शिफारस केली.
पंडित केशव गिंडे यांचा जन्म 5 सप्टेंबर, 1942 साली पुणे येथे झाला. त्यांनी संगीत हा विषय घेऊन पीएच.डी. केलेली आहे. बासरी कादनाचे शिक्षण त्यांनी गुरु पं. देवेंद्र मुर्डेश्वर, पं. हरिपद चौधरी यांच्याकडे घेतले. गिंडे यांनी देशविदेशातील अनेक संगीत मैफिली तसेच आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील अनेक राष्ट्रीय संगीत सभेत सहभाग घेतला. परदेशातील विद्यापीठात मास्टर डिग्रीच्या मुलांना शास्त्रीय संगीताच्या प्रात्याक्षिकासह व्याख्याने दिलेली आहेत. गेल्या चार दशकांपेक्षा अधिक काळात त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
केशव वेणूचा निर्माता
पंडित केशव गिंडे यांनी वेदकाळापासून चालत आलेल्या बासरीमध्ये अभूतपूर्व परिवर्तन केले. त्यांनी पं. पन्नालाल घोष यांच्या वाटेने जात 1984 साली ‘केशव वेणू’ या बासरीची निर्मिती केली. या बासरीची नोंद ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ तसेच ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ ने घेतली आहे. बासरी ‘सात सप्तकात’ वाजवण्याचा ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ त्यांच्या नावावर आहे.






























































