
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईतील सर्व खड्डे शनिवारपर्यंत बुजवा अशी सक्त ताकीद पालिकेने कंत्राटदारांना दिली आहे. या ‘डेडलाइन’नंतर कुठल्याही विभागात खड्डे दिसले तर संबंधित कंत्राटदाराला याबाबत जाब विचारला जाणार असून कारवाईलाही सामोरे जावे लागणार आहे. पालिकेने दिलेल्या ‘डेडलाइन’मुळे कंत्राटदारांचे धाबे दणाणले असून खड्डे बुजवण्यासाठी धावपळ उडाली आहे.
खड्डे बुजवण्याचे काम करणाऱया कंत्राटदारांना शास्त्रोक्त पद्धतीनेच खड्डे बुजवावे लागणार आहेत. बुजवलेला खड्डा जर पुन्हा उखडला तर संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, झोन तीनमध्ये रस्त्याचे काम चुकीच्या पद्धतीने करणारा कंत्राटदार मनदीप सिंग कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्यात आल्याची माहिती रस्ते विभागाचे मुख्य अभियंता विनोद चिठोरे यांनी दिली. खड्डे भरण्यासाठी कोल्डमिक्सची निर्मिती रेडिएशनच्या अडथळ्यामुळे बंद पडली आहे, मात्र हा अडथळा दूर झाला असून शनिवारपासून कोल्डमिक्सची निर्मिती पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती चिठोरे यांनी दिली.


























































