सामना ऑनलाईन । मुंबई
बोरिवली, दहिसर, कांदिवलीतील सफाई कामगारांनी गेल्या आठवडय़ात केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील अहवाल मंगळवारी स्थायी समितीला सादर होण्याची शक्यता आहे.
कांदिवली, बोरिवली, दहिसर या विभागांतील कचरा वाहनात भरणे व तो वाहून नेऊन त्याची विल्हेवाट डंपिंग ग्राऊंडपर्यंत लावण्याचे काम पालिकेने कंत्राटदाराला दिले आहे. त्यामुळे या विभागातील कचरागाडय़ांवर काम करणाऱ्या नियमित कामगारांना दुसऱ्या विभागात कामासाठी पाठवले आहे. त्यामुळे या कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते. या विभागात चार दिवस कचऱ्याचे डोंगर साठले होते. आंदोलन चिघळल्याचे लक्षात आल्यावर प्रशासनाने आंदोलनाची दखल घेऊन शुक्रवारी त्यावर तोडगा काढला. दरम्यान, पदानुसार कामे दिली जातील, कोणत्याही कामगाराची बदली केली जाणार नाही. तसेच इतर मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन प्रशासनाने दिले. त्यास्वरूपातील आढावा स्थायी समितीला सादर करण्याची ग्वाही घनकचरा विभागाचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत हा अहवाल सादर केला जाणार आहे. या अहवालानंतर कामगार संघटना आपली भूमिका निश्चित करणार असल्याची माहिती समन्वय समितीचे नेते संजय वाघ यांनी दिली.
दरम्यान, हे कंत्राट फक्त चार विभागांपुरते मर्यादित नसून टप्प्याटप्प्याने सर्व 24 विभागांत सुरू केले जाणार आहे. त्यामुळे सद्या काम करीत असलेल्या 5500 मोटर लोडर कामगारांचे काम कायमस्वरूपी संपुष्टात येणार आहे.
काय असेल अहवालात
अहवालात पालिकेत किती कामगार आहेत, किती कामगारांचे समायोजन केले जाणार, कामगारांवर किती परिणाम होईल, याचा तपशील यात नमूद असेल, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली. दरम्यान, सफाई कामगारांबाबतच्या अहवालात सकारात्मक माहिती नसल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.




























































