
मुंबई महानगरपालिकेच्या वाढलेल्या 9 प्रभागांसह 236 वॉर्डच्या आरक्षणाची लॉटरी उद्या 31 मे रोजी सकाळी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. आरक्षणाची सोडत काढताना मागील तीन निवडणुकांत सलग दोन वेळा महिला किंवा पुरुष आरक्षण असलेल्या वॉर्डमधील आरक्षण यावेळी बदलणार आहे. शिवाय वॉर्डच्या बदललेल्या सीमांमुळे बूथच्या वाढलेल्या संख्येनुसार आणि ‘एससी, एसटी’ प्रवर्गाचे आरक्षण लोकसंख्येनुसार जाहीर होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये आरक्षणाची प्रचंड उत्सुकता असली तरी धाकधूकही वाढली आहे.
ओबीसीच्या 61 जागा खुल्या प्रवर्गासाठी
महापालिकेच्या निवडणुका ‘ओबीसी’ आरक्षणाशिवाय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे मुंबई महानगरपालिकेत 2017 च्या निवडणुकीत ‘ओबीसी’साठी राखीव असलेल्या 61 जागा खुल्या प्रवर्गासाठी जाणार आहेत.
6 जूनपर्यंत हरकती–सूचना
31 मे रोजी आरक्षण जाहीर झाल्यानंतर नागरिकांना 6 जूनपर्यंत हरकती व सूचना मांडता येणार आहेत.
पालिकेच्या 24 प्रभागांमध्ये 25 ठिकाणी हरकती-सूचना नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
13 जून रोजी अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची कार्यवाही सुरू केली आहे. यामध्ये आयोगाने राज्यातील 14 महापालिकांना 31 मेपर्यंत आरक्षण सोडत जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार मुंबई महानगरपालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. जाहीर होणाऱया आरक्षणात पहिल्यांदा ‘एससी’, ‘एसटी’ प्रवर्गाचे आरक्षण जाहीर केले जाणार असून त्यानंतर सर्वसाधारण महिला आणि त्यानंतर खुल्या गटाचे आरक्षण जाहीर केले जाणार असून पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडेल. शालेय विद्यार्थ्यांकडून आरक्षणाच्या चिठ्ठय़ा उचलण्यात येणार आहेत.
असा राहणार प्राधान्यक्रम
प्राधान्यक्रम 1 – मागील तीन निवडणुकांत महिलांना आरक्षण नसल्यास यावेळी महिलांना प्राधान्य
प्राधान्यक्रम 2 – 2007 च्या निवडणुकीत महिलांना राखीव होता, पण 2012 आणि 2017 मध्ये नसल्यास महिलांना प्राधान्य
प्राधान्यक्रम 3 – 2007 मध्ये राखीव होता मात्र 2012 व 2017 मध्ये नसल्यास आरक्षणासाठी प्राधान्य देण्यात येईल.
महिला–पुरुष फिफ्टी–फिफ्टी
एकूण वॉर्ड – 236 (15 वॉर्ड अनुसूचित
जाती, 2 वॉर्ड अनुसूचित जमाती)
महिला – 118 पुरुष – 118



























































