हिंदुस्थान बंदला नांदेडमध्ये चांगला प्रतिसाद

सामना प्रतिनिधी । नांदेड

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आज हिंदुस्थान बंदचे आयोजन करण्यात आले होते. या बंदला नांदेडमध्ये तसेच जिल्ह्याच्या विविध भागात चांगला प्रतिसाद मिळाला. काँग्रेसचे आमदार डि.पी.सावंत व आमदार अमर राजूरकर यांनी आज शहरात मोटारसायकल रॅली काढून शासनाचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध केला.

पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ आज नांदेड शहर व जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. आज सकाळी दहा वाजल्यापासूनच शहरातील सर्व बाजारपेठा कडकडीत बंद होत्या. सर्व शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस यांना सुट्टी देण्यात आली होती. शहर व जिल्ह्यातील बससेवा देखील यामुळे विस्कळीत झाली. विद्यापीठात देखील युवक काँग्रेसने जावून तेथे बंद पाळण्याची विनंती केली. तेथेही उत्स्फूर्त बंद झाला. सकाळी ११ वाजता आमदार डी.पी.सावंत, आमदार अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल रॅली काढण्यात आली. भव्य अशा मोटारसायकली रॅलीमुळे शहर दणाणून गेले होते.

व्यापाऱ्यांना विनम्र आवाहन करत बंदमध्ये सहभागी होण्याची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विनंती केली. शहरातील वजिराबाद, शिवाजीनगर, जुनामोंढा, देगलूर नाका, श्रीनगर, वर्कशॉप आदी भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसने आज शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध केला. तसेच मनसेनेही या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

काँग्रेसची भव्य मोटारसायकल रॅली ही आजच्या बंदचे वैशिष्ट्ये होते. यावेळी बोलताना आमदार अमर राजूरकर म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून सतत वाढणारे पेट्रोल व डिझेलचे दर यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पर्यायाने महागाई गगनाला भिडली आहे. त्यातच गॅसचे दर देखील वाढविण्यात आल्याने ऐन सणासुदीत सर्वसामान्य व मध्यमवर्गियांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. गोरगरीब जनता महागाईमुळे त्रस्त झाली असताना यावर केंद्र सरकारचा प्रतिनिधी बोलायलाही तयार नाही, त्याचा आम्ही निषेध करतो. नांदेडकरांनी आजचा दिलेला प्रतिसाद उत्स्फूर्त होता. सर्व व्यापारी, शैक्षणिक संस्था व नागरिक यांचे आपण आभार मानतो, अशा भावना आमदार अमर राजूरकर यांनी व्यक्त केल्या.