अरेच्चा! सोने भुरभुरलेले फ्रेंच फ्राईज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फास्ट फूडच्या यादीत फ्रेंच फ्राईज हा पदार्थ टॉपवर असतो. लहानांपासून मोठय़ांना सर्वांनाच फ्रेंच फ्राईज आवडतात. त्याची किंमत 50 रुपयांपासून फार तर 500 रुपये इतकी असू शकते. मात्र, अमेरिकेतील एका रेस्टॉरंटमध्ये याची किंमत जवळपास 15 हजार रुपये इतकी आहे. हा पदार्थ इतका महाग असण्याचे कारण काय? असा प्रश्न नक्कीच पडतो, तर याचे उत्तर आहे, सोने. होय… या फ्रेंच फ्राईजवर चक्क सोने भुरभुरतात. रेस्टॉरंटमध्ये ‘क्रीम डी ला क्रीम पोम फ्राईज’ या नावाने हा खास पदार्थ दिला जातो. त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे.

न्यूयॉर्कच्या ‘सेरेनडिप्टी 3’ या रेस्टॉरंटमध्ये हे गोल्डन फ्रेंच फ्राईज मिळतात. शेफ जो आणि शेफ फ्रेडिक यांनी हे जगातील सर्वात महागडे फ्रेंच फ्राईज बनवले आहेत. त्यासाठी चांगल्या दर्जाचे बटाटे वापरले जातात. ‘विंटेज 2006’ची शँपेन, जे ली ब्लॅक फ्रेंच शँपेन व्हिनेगार, ट्रफल सॉल्ट, ट्रफल ऑईल, विशेष प्रकारचे चीज, बटर तसेच 23 कॅरेट एडिबल गोल्डचे डस्टिंग यांचा वापर होतो. जर्सी गाईंच्या दुधापासून मिळणारे क्रीम यामध्ये वापरले जाते. इतकी महागडी सामग्री वापरून फ्रेंच फ्राईज तयार केले जातात. ते खास मोर्ने सॉसबरोबर सर्व्ह केले जाते.