
सामना प्रतिनिधी, महाड
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या डागडुजीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र गडाला पुनर्वैभव मिळणार ही तमाम मराठी मुलखाला आनंदाची ‘तोरणे’ चढवण्यासारखेच असले तरी हे काम करत असताना ठेकेदाराचा तुघलकी कारभार चव्हाटय़ावर आला आहे. डागडुजीस लागणारे दगड बाहेरून आणण्याऐवजी कंत्राटदारांनी चक्क रायगडचा पायथा खणण्यास सुरुवात केली आहे. दिवसाढवळय़ा सुरुंग लावून पाचाड, रायगडवाडी, निजामपूर परिसरातील डोंगरच्या डोंगर फोडले जात आहेत. त्यामुळे एकीकडे डागडुजीचे कळस चढवले जात असताना रायगडाच्या पायावर मात्र घाला घातला जात आहे.
सरकारने महाराष्ट्रातील गडांचे संवर्धन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडला गतवैभव देण्यात येणार आहे. यासाठी खासदार संभाजीराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली रायगड संवर्धन विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. गडाच्या डागडुजीसाठी प्रशांत पोळेकर (पुणे) व नागनाथ चव्हाण (अलिबाग) या ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली आहे, परंतु हे काम करत असताना लागणारे दगड किल्ल्याच्या परिसरातील न आणता बाहेरून आणावेत, अशी सक्त ताकीद देण्यात आली होती. मात्र सरकारच्या दुर्लक्षित कारणामुळे ठेकेदारांनी पैसे वाचवण्यासाठी थेट गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड, रायगडवाडी व निजामपूर परिसरातील मोठमोठे डोंगर फोडले जात आहेत.
धक्कादायक म्हणजे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता भूसुरुंग लावले जात आहेत. इतका भयंकर कारभार सुरू असताना संवर्धनासाठी नेमलेले प्राधिकरण डोळेझाक करत आहे. त्यामुळे डागडुजीच्या नावाखाली किल्ले राजधानीला दगडमाफियांनी घातलेला ‘वेढा’ तत्काळ हटवा, अशी मागणी शिवप्रेमी जनतेने केली आहे.
प्रशासनाला खडबडून जाग
गडाच्या पायथ्याला धोंडू शिंदे यांच्यासह 20 शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. त्यांची कोणतीही परवानगी न घेता गेल्या काही महिन्यांपासून ठेकेदार डोंगर फोडण्याचे काम करत आहेत. त्यामुळे संवर्धन राहिले बाजूला, गडाच्या पायथ्याचे विद्रुपीकरण करण्याचे काम केले जात आहे. याविरोधात शिवप्रेमींनी आवाज उठवल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली असून प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.


























































