कालावल खाडीपट्यात महसुलाची धडक कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मालवण

कालावल खाडीपट्टयातील वाळु उत्खननाची मुदत संपलेल्या ठिकाणी महसुल विभागाने आज दुसऱ्या दिवशी धडक कारवाई करीत एकूण 17 रॅम्प उद्धवस्त केले.

मालवण तालुक्यातील कालावल आणि कर्ली खाडीपात्रात होत असलेल्या बेकायदेशीर वाळु उत्खननाबाबत तेथील ग्रामस्थांच्या तक्रारी असून कालावल खाडीपात्रातील काही वाळु उपशाच्या परवान्याची मुदत ही 29 मे रोजी संपूनही वायंगणी कालावल खाडीपट्टयातील बेकायदेशीर वाळु उत्खनन केले जात असल्याची तक्रार मसुरे गावचे ग्रामस्थ अनिल मसुरकर यांनी महसुल विभागाकडे केली होती.

गेले दोन दिवस महसुलच्या धडक कारवाईस सुरुवात झाली. सोमवारी महसुल विभागाने मसुरे कावावाडी आणि तेरई येथील एकूण सहा रॅम्प उद्ध्वस्त केले होते. आज आचरा मंडल अधिकारी मिलिंद पारकर, श्रावण मंडल अधिकारी एस. ए. पवार, हडी तलाठी अनिल राणे, वायंगणी तलाठी काळे तसेच हडी, वायंगणी तलाठी सजाचे दोन कर्मचारी यांच्या पथकाने बांदिवडे आणि वायंगणी कालावल येथील वाळु उत्खननाची मुदत संपलेल्या रॅम्पवर बुलडोझर फिरविला. बांदिवडे येथील एक आणि वायंगणी कालावल येथील 16 रॅम्पवर महसुल विभागाने धडक कारवाई केली. या पुढे महसूल विभागाची धडक कारवाई सुरूच राहील अशी माहिती निवासी नायब तहसीलदार आनंद मालवणकर यांनी दिली आहे.