
>> अस्मिता प्रदीप येंडे
मनात अनेक विचार येत असतात, अनेक विषय मिळतात, पण तो विषय योग्य पद्धतीने आपल्या लेखणीतून मांडणं सोपे नसते. त्यासाठी उत्स्फूर्तता, प्रतिभा, निरीक्षणशक्ती आणि आकलनशक्ती आवश्यक असते. या सगळ्या गुणांनी युक्त अशा लेखिका प्रा. विजया पंडितराव यांचं ‘मोरपंखी’ हे संकीर्ण स्वरूपाचे पुस्तक म्हणजे भावनांना लाभलेलं शब्दरूपी कांदण आहे. ललित लेख, माहितीपर लेख, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन, वैचारिक लेख अशा वैविध्यपूर्ण लेख प्रकारांची बैठक या पुस्तकात जमलेली आहे.
ललित लेख या विभागातील ‘सुगंधी सकाळ’ हा लेख वाचल्यानंतर लेखिकेच्या तरल, संवेदनशील मनाची जाणीव झाली आणि त्या प्रसन्न सकाळच्या वातावरणात मनाने केव्हा पोहोचले, समजले नाही. छोटय़ा छोटय़ा, साध्या गोष्टीकडे त्या किती प्रांजलपणे पाहतात! ‘स्वतःला शोधताना’ हा लेख विविधांगांनी विचार करायला लावणारा लेख आहे. एखाद्या गोष्टीची सुरुवात करायची असेल तर ती स्वतःपासून करावी, आयुष्य जगण्याचं सूत्र लेखिका सहजपणे सांगून जातात. या लेखातून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर मुद्देसूद भाष्य केले आहे.
माहितीपर लेख या विभागात मराठी साहित्यात आपल्या लेखणीने मोलाचे योगदान दिलेल्या अशा थोर व्यक्तींवर लेख लिहिले आहेत. प्राचीन मराठी कवितेत पंडिती कवितेचे योगदान मोलाचे आहे. मोरोपंत हे पंडिती परंपरेतील सर्वश्रेष्ठ कवी. त्यांनी रचलेली काव्यं, त्यांचे साहित्य, त्यातून त्यांनी मांडलेले विचार ‘शब्दप्रभू मयूरपंडित’ या लेखातून विस्तृतपणे मांडले आहे. ‘योग्याचा अस्त’ या लेखातून ज्येष्ठ समीक्षक म. सु. पाटील यांच्या एकूण जीवन आणि लेखनावर लेखिकेने विवेचन केले आहे. त्यांची शिकवण्याची शैली, सगळ्यांना सामावून घेण्याची वृत्ती, त्यांचे लेखन, त्यामागील त्यांची दृष्टी तसेच डॉ. म. सु. पाटील सगळ्यांचे लाडके बाबा कसे झाले, याचं वर्णन लेखिकेने संयतपणे केले आहे.
या पुस्तकातील वैचारिक लेखही विचारांना नवी दिशा देणारे आहेत. ‘एकोणिसाव्या शतकातील स्त्र्ायांची आत्मचरित्रे’ या लेखातून तत्कालीन स्त्र्ायांचं जीवन, रूढी-परंपरा, स्त्र्ायांचं शिक्षण, समाज व्यवस्था, सामाजिक, राजकीय दृष्टिकोन या सगळ्या संदर्भाचा धांडोळा घेतला आहे. ‘मोरपंखी’ हे पुस्तक म्हणजे अनुभवसंपन्न भावनांचा हृद्य सोहळा आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक आणि समर्पक आहे. ज्येष्ठ कथालेखिका, कथाकथनकार प्रा.माधवी घारपुरे यांनी मनस्वी प्रस्तावना लिहिली आहे.
मोरपंखी – संकीर्ण
लेखिका – प्रा. विजया पंडितराव
प्रकाशक – सृजन संवाद प्रकाशन
मूल्य – रुपये 275/-




























































