अभिप्राय – साहसी मराठय़ांची यशोगाथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अस्मिता प्रदीप येंडे

मराठी साहित्यात अनेक लेखन प्रकार आहेत. काव्य, ललित लेखन, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन इत्यादी… यासाठी लागते ती स्फूर्ती, संवेदनशीलता… पण ऐतिहासिक लेखनासाठी त्या त्या काळातील प्रसंग, तारखा, वेळ, घटनाक्रम या सगळ्यांचे व्यवस्थित आकलन करून, संदर्भग्रंथ वाचून लेखन करावे लागते. कारण इतिहास म्हणजे भूतकाळ… त्यात जे जसे घड़ले ते योग्य पद्धतीने वाचकांसमोर येणे गरजेचे असते.

शालेय जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची ओळख आपल्याला झाली. महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, अफजल खान वध, पन्हाळय़ाहून सुटका, सुरतेची लूट या सगळ्या घटना आपण पुस्तकात वाचल्या आहेत तसेच चित्रपट, मालिका याद्वारे पाहिल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांनी लढलेल्या लढाया, त्यांच्याबद्दल असलेले अनेक गैरसमज, त्यांच्याविरुद्ध केलेली कारस्थाने हा इतिहास विविध लेखकांनी आपल्या लेखणीतून मांडला आहे. इतिहास लेखनात अनेक मत-मतांतरेसुद्धा दिसून येतात.
मराठी गद्य सारस्वताच्या इतिहासातील बखर वाड्.मयाचे स्थान महत्त्वपूर्ण असे आहे. खबर या अरबी शब्दाचा विपर्यास होऊन बखर शब्दाची निर्मिती झाली. ऐतिहासिक वृत्तकथनाच्या गरजेतून मराठी बखर वाड्.मयाची निर्मिती झाली. शिवपूर्वकाळातील महिकावतीची बखर ही सर्वात जुनी बखर आहे. सभासदाची बखर हेर शिवकालीन पहिली बखर होय. अशा अनेक बखरी लिहिल्या गेल्या.

लेखक अनंत ओगले लिखित ‘बखर मराठेशाहीची’ हे पुस्तक मराठय़ांच्या शूर पराक्रमाची स्मरणगाथा आहे. शहाजी राजांच्या जन्मापासून इ.स. 1594पासून ते 1818मध्ये पेशवाईच्या अस्तापर्यंतचा 225 वर्षांपर्यंतचा मराठय़ांचा इतिहास आणि त्यापूर्वीची 25 वर्षे असे एकूण 250 वर्षांचा कालखंड या पुस्तकात लेखकाने मांडला आहे. व्यास क्रिएशन्स या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

स्वराज्यावर मुस्लिमांनी किती अन्याय, अत्याचार केले. गावे लुटली, स्त्र्ाया, मुलांचे अपहरण केले, धर्मांतरे घडवून आणली, मंदिरे उद्ध्वस्त केली, गरीब रयतेवर अत्याचार केले. पण मराठे मागे हटले नाहीत. स्वतःच्या जिवाची बाजी लावून प्रसंगी प्राणाची आहुतीसुद्धा दिली आहे. या सगळ्या मराठय़ांच्या पराक्रमाची गाथा वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. लेखक अनंत ओगले यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रत्येक घटना, प्रसंग सोप्या शब्दांत मांडले आहेत.

शहाजीराजांनी केलेल्या लढाया, त्यांची युद्धनीती, त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण जगासाठी जाणता राजाच. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची स्वराज्याप्रती असलेली भावना आणि आदर माहीत आहेच. त्यांच्यामुळे आज महाराष्ट्र इतके घाव सोसूनही स्वतःच्या पायावर उभा आहे. स्वराज्याच्या लढाईत अनेक सरदार, मावळे यांचे योगदानही तितकेच महत्त्वपूर्ण आहे.

अशा अनेक वीरांची माहिती नवीन पिढीस नाही. असे अनेक वीर या मराठेशाहीत होऊन गेले… त्यांचा पराक्रम, त्यांचे बलिदान याबद्दल इत्थंभूत माहिती इतिहास अभ्यासक, वाचक यांना मिळावी, यासाठी या पुस्तकाची निर्मिती लेखकाने केली आहे. अशा शूर मराठय़ांचा पराक्रम वाचताना पुढे काय अशी उत्सुकता निर्माण होत राहते. त्या काळी दळणवळणाची साधने, सुखसोयी नसतानासुद्धा सन्देशवहन नीट व्हायचं, प्रवास करून एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी जात असत. हे सगळं वाचताना अचंबित व्हायला होतं.

तंजावर ते अटक… मराठय़ांची चौफेर घोड़दौड़ म्हणजेच ‘बखर मराठेशाहीची’… मराठयांच्या कर्तृत्वाची यशोगाथा आहे. हिंदुस्थानावर अनेक परकीय आक्रमणे झाली. पण या आक्रमणांना सड़ेतोड़ उत्तर देणारी ‘मराठे’ नावाची शक्ती होती, आहे आणि राहणार!

‘बखर मराठेशाहीची’ हे पुस्तक इतिहासप्रेमी, इतिहास संशोधक, अभ्यासक यांच्यासाठी मार्गदर्शक आहे. पुस्तकात संदर्भ ग्रंथाची यादी दिलेली आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ सुधीर मुणगेकर यांनी सजवले आहे. इतिहास घडत नाही तो घड़वावा लागतो. स्वराज्याचे वेड असावे लागते… तेच लोक इतिहास घडवतात. वाचकांनी आपल्या पुस्तकांच्या यादीत हे पुस्तक नक्की समाविष्ट करायला हवे.
बखर मराठेशाहीची
लेखक ः अनंत ओगले
प्रकाशक ः व्यास क्रिएशन्स
मूल्य ः रुपये 400/-