
>> क्षितीज झारापकर
‘माझी माय सरसोती’ अमेरिकेत स्थायिक झालेल्या अनुराधा गानू यांनी पाश्चात्य ऑपेराच्या धर्तीवर बहिणाबाईंच्या ओव्या रंगभूमीवर आणल्या आहेत.
काळानुरूप समाज बदलत जातो. संस्कृती ही काही दगडावर कोरलेली गोष्ट नव्हे. सभोवतालच्या परिस्थितीप्रमाणे संस्कृती बदलत जाते. माणसं आपल्या उद्धाराच्या शोधात आपल्या समाजापासून दूर जातात तेव्हा ते आपल्या डोक्यात आपल्या संस्कृतीचा म्हणून एक ते मूळ त्यांच्या मनातल्या स्नॅपशॉटप्रमाणे संस्कृती जोपासतात. मूळ समाजातून कदाचित काही गोष्टी विस्मृतीतदेखील गेलेल्या असतात. पण त्या परप्रांती सेटल झालेल्यांच्या जोपासण्यातून जिवंत राहतात. आपल्या महाराष्ट्राच्या संत वाङ्मयाचं थोडं असंच झालंय. सणासुदीला आपल्याला ते आठवतं. त्यातली शिकवण किती अमूल्य आहे याची आपल्याला तेव्हा जाणीवही होते. पण दुसऱयाच क्षणी मात्र आपण पुढे मार्गस्थ होतो. बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यापैकी ‘अरे संसार संसार’ हे फक्त आता नाटक-सिनेमाच्या शीर्षकात वापरलं गेल्यामुळे आपल्या चटकन लक्षात राहतं. पण बहिणाबाईंच्या एकूण लिखाणात किती प्रगल्भ, मौलिक आणि आवश्यक विचार अत्यंत सोप्या शब्दांत मांडला गेलाय हे आपण विसरतो. अमेरिकेत स्थायिक झालेल्या अनुराधा गानू यांनी बहिणाबाईंच्या काव्याचा संशोधनपर अभ्यास करून त्याचं सादरीकरण करण्याचं ठरवलं. अमेरिकेत राहात असल्याने त्यांना तेथील ब्रॉडवे आणि ऑपेरा स्टाइलचे शो माहीत होते. अनुराधा गानू यांनी त्या धर्तीवर बहिणाबाईंच्या काव्याचा कार्यक्रम रचण्याचं ठरवलं आणि ‘माझी माय सरसोती’ हे मराठी नाटक जन्माला आलं.
‘माझी माय सरसोती’ या नाटकात बहिणाबाईंच्या काव्यातील रचना स्वरबद्ध करून संगीतमय पद्धतीने सादर केल्या गेल्या आहेत. पण ‘माझी माय सरसोती’ हा गाण्यांचा कार्यक्रम नाही. यात बहिणाबाईंची जीवनगाथा आहे. काही गाण्यांवर रचित नृत्य आहेत तर काही ठिकाणी लयित बसवलेले प्रसंग आहेत. काही ओव्या स्वतः गातात तर बाकी गीतं ध्वनीमुद्रित केलेली आहेत. ‘माझी माय सरसोती’चा अनुभव भव्यतेच्या जवळ जाणारा आहे. या भव्यतेमुळे ‘माझी माय सरसोती’ हे बहिणाबाईंचं चरित्रनाटय़ म्हणवण्याजोगं होतं. बहिणाबाईंचा महाराष्ट्राच्या समाजमनावरचा पगडा या भव्यतेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित होतो.
‘माझी माय सरसोती’सारखं सादरीकरण सोपं नाही. हे उभं करायला प्रचंड ताफा लागतो. इथे हा ताफा एका वेल ऑइल्ड मशीनसारखा कार्यरत असलेला आढळतो. केवळ कलाकारांचा संच नव्हे तर बॅकस्टेज सांभाळणारेसुद्धा यात आले. ‘माझी माय सरसोती’ हा एक खूप डिसिप्लिन्ड परफॉर्मन्स आहे. श्रीपाद जोशी आणि गणेश पंडीत यांनी हे दिग्दर्शित करताना कटाक्षाने हे अनुशासन जपलेलं दिसतं. रंगमंचावर खूप पात्रं असूनही गर्दी वाटत नाही. ती तेवढी गरजेची वाटतात हे विशेष. दुसऱया अंकात एका गीतात बहिणा लग्न होऊन सासरी येते तो प्रसंग करताना बहिणाबाई गर्दीत वेगळी काढण्याकरता बाकीची सगळी पात्रं स्लो मोशनमध्ये वावरतात हे कमाल आहे. सिद्धेश पुजारे आणि वेदांगी कुळकर्णी या नृत्य दिग्दर्शकांचंही इथे कौतुक करायला हवं. ‘माझी माय सरसोती’मधली सगळीच नृत्ये ही स्वाभाविक वाटावी अशीच आहेत.
मिलिंद जोशी यांचं संगीत खूप वेगळं आणि सुरेख आहे. बहिणाबाईंच्या काव्याचं मीटर हे मुळात जात्यावरच्या ओव्यांचं आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या तोंडात बसलेल्या या चाली. त्या चाली मोडून नवीन प्रयोग करण्याचं धाडस मिलिंदने केलं. हे त्यांचं धाडस यशस्वीदेखील झालंय. ‘अरे संसार संसार’ किंवा ‘खोप्या’मध्ये खोपासारख्या अत्यंत लोकप्रिय काव्याला मिलिंद यांनी ‘माझी माय सरसोती’मध्ये दिलेल्या चाली लाजवाब आहेत. नाटकाच्या शेवटी येणारी दिंडीदेखील मस्त जमली आहे. मनीषा जोशी, सीमा चंद्रगुप्त, अन्विता भुरे आणि साकार बर्वे यांचे आवाजही मोहक आहेत. राजेंद्र वैशंपायन यांचं पार्श्वसंगीत अत्यंत पूरक झालंय. संदेश बेंद्रे हे आता मराठी नाटकातलं नेपथ्याचं ब्रॅन्डनेम झालेलं आहे. ‘माझी माय सरसोती’साठी त्यांनी एक खूप सोपा, पण तरीही परिणामकारक सेट दिला आहे. मुळात खूप कलाकार रंगमंचावर वावरणार, त्यात नाचणार आहेत हे भान ठेवून संदेश यांनी नेपथ्य साधलं आहे.
दिनेश कानडे, स्नेहल चांदवडकर, साबा राऊळ, हर्ष दानवे, निमिषा माने, प्रणाली आंबोकर हे कलाकार आणि पार्थ गायकवाड, दिशा बाळ, राज्ञी मालप, सई देव, आर्या गाडे, ख्याती कदम हे बालकलाकार सगळे योग्य बेअरिंग घेऊन आपापली पात्रं साकारतात. कुठेही उसनं अवसान आणल्याचा भासही होत नाही. परी तेलंग या नावाजलेल्या अभिनेत्रीने बहिणाबाईंची सगळी रूपं अगदी व्यवस्थितपणे साकारली आहेत. मुलगी, सून, आई आणि वृद्धापकाळातल्या बहिणाबाई अशा विविध पैलूंतून परीने हे चरित्र उभं केलंय. गणेश गुरव, अक्षय घाडीगावकर, मिहीर सांगले, प्रतीक धुमाळ, किरण सासणे, प्रणाली आंबोकर, स्नेहा पाटील, निमिषा माने, श्रद्धा गोरेगावकर, तन्वी पाडावे, सायली जाधव, दीपिका परब, धीरज टकले, प्रफुल्ल आचरेकर, लिनीता भालेराव आणि महेश शिंदे हे नृत्य कलाकारदेखील ‘माझी माय सरसोती’ अधिक परिणामकारक करण्यात भर घालतात.
एकंदरीत ‘माझी माय सरसोती’ हे सध्याच्या मराठी नाटकांच्या बदलत्या व्याख्येत बसणारं असं एक मोठं प्रॉडक्शन आहे. निर्मात्यांनी याची जाण ठेवून या नाटकाची निर्मिती केलेली आहे. कुठेही हात राखून ठेवलेला नाही की कुठे अवास्तव खर्च केलेला नाही. त्यामुळे ‘माझी माय सरसोती’ हे एक विशेष दखलपात्र नाटक ठरतं.
नाटक – माझी माय सरसोती द म्युझिकल
निर्मिती – सॉनिक ऑक्टव्हज्, जीवनकला व अनामिका
कार्यकारी निर्माते – राजेंद्र वैशंपायन
संकल्पना व लेखन – अनुराधा गानू
प्रकाशयोजना – उन्मेश वीरकर
वेशभूषा – तेजश्री आक्रे
नेपथ्य – संदेश बेंद्रे
पार्श्वगायक – मिलिंद जोशी, मनीषा जोशी
नृत्य दिग्दर्शक – सिद्धेश पुजारे, वेदांगी कुळकर्णी
कलाकार – परी तेलंग, स्नेहल चांदवडकर, साबा राऊळ, सई देव, आर्या गाडे, राज्ञी मालप, दिशा बाळ, प्रणाली आंबोकर, ख्याती कदम, स्नेहा पटेल, निमिषा माने, श्रद्धा गोरेगावकर, तन्वी पाडावे, सायली जाधव, दीपिका परब, लिनिता भालेराव, हर्ष दानवे, दिनेश कानडे, पार्थ गायकवाड, महेश शिंदे, गणेश गुरव, अक्षय घाडीगांवकर, मिहीर संगले, प्रतिक धुमाळ, किरण ससाणे, धीरज टकले, प्रफुल्ल आचरेकर.
दर्जा – अडीच स्टार

























































