हाऊसफुल्ल : दर्जेदार ठसा ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

एखाद्या  कलाकाराचं आयुष्य, त्याचं वलय, त्याच्या आयुष्यात येणार्‍या अडचणी, त्याच्या आयुष्याचा उदय, तळपता काळ आणि अस्त…. या सगळ्यातच एखादी कथा असते. अशी कथा की जी  प्रेक्षकाला खिळवून ठेवू शकेल. ‘आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर’ हा सिनेमाही त्याच ओळीतला सिनेमा आहे. तुम्ही जर काशिनाथ घाणेकर या अभिनेत्याला अनुभवलं असेल तर तुम्हाला भूतकाळात पुन्हा एकदा शिरण्यासाठी आणि पुन्हा एकदा तो काळ अनुभवण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. त्याकाळी काशीनाथ घाणेकर जेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर होते तेव्हा काय घडलं होतं, जेव्हा प्रेक्षक म्हणून आपणच उपेक्षा करत होतो तेव्हा नेमकं काय घडत होतं, असे असंख्य पदर हा सिनेमा पहाताना उलगडतात आणि आपण त्यात कधी एकरूप होतो हे कळतही नाही.

ही कथा आहे रंगभूमीच्या पहिल्या सुपरस्टारची. डॉक्टर काशीनाथ घाणेकर जुन्या मुंबईतले नामवंत दंतशल्यविशारद आणि त्यांचा सुपरस्टारच्या दिशेने होणारा प्रवास आणि मग शोकांतिकेकडची वाटचाल. हे बघताना खरंच भारावून जायला होतं.

या सिनेमाचा सगळ्यात मोठा आणि भक्कम मुद्दा आहे तो त्यांच्या व्यक्तिरेखांचा. डॉक्टर घाणेकरांची भूमिका सुबोध भावेनी केली आहे. आजवर विविध चरित्रात्मक सिनेमांमध्ये मध्यवर्ती भूमिका करूनही तो पुन्हा एकदा काशिनाथ घाणेकर म्हणून जबरदस्त भुरळ घालतो. डोळे घारे करण्यासाठी त्याने भले लेन्स घातल्या असतील पण त्या मागच्या डोळ्यातला अभिनय मात्र संपूर्णपणे त्याचा आहे आणि तो त्याने जिंकला आहे. सुबोधच्या व्यक्तिरेखेला तोडीस तोड इतरही व्यक्तिरेखा उभ्या राहिल्या आहेत आणि त्या इतक्या सक्षम आहेत की, जर तुम्हाला त्या व्यक्तिरेखा ठाऊक असतील तर त्याच समोर वावरतायत असं वाटल्याशिवाय रहाणार नाही. आणि जर माहिती नसतील तर त्या व्यक्तिरेखा ज्या पद्धतीने रंगवल्या आहेत त्यात तुम्ही नक्की गुंतून पडाल. सुमित राघवनने रंगवलेले डॉक्टर लागू अप्रतिम. त्यांच्यासोबत उभं केलेलं ‘पिंजरा’तलं गाणं बघताना जबरदस्त मजा येते. प्रसाद ओकनेदेखील अफलातून प्रभाकर पणशीकर एकदम ताकदीने उभे केले आहेत. शिवाय आनंद इंगळे यांनी साकारलेला वसंत कानेटकर, नंदिता धुरी, सोनाली कुलकर्णी सगळेच झक्कास.

या सिनेमाची पटकथा, नेमके संवाद, काळ उभा करण्यासाठी घेतलेली मेहनत या सिनेमाचा दर्जा नक्कीच उंचावते. पहिल्या अर्ध्या भागात तर सिनेमा पार खिळवून ठेवतो. जी नाटकं आणि सिनेमे एकेकाळी गाजले होते त्यांच्यातले काही भाग पुन्हा जिवंत हेऊन पडद्यावर साकारतो. आणि त्यातले काही सखेल संवाद सुबोध ज्या पद्धतीने घेतो ते पाहताना जर कधी काळी नाटकात प्रत्यक्ष घाणेकरांनी ठसा उमटवला असेल तर तोच ठसा आता या सिनेमात सुबोध पुन्हा ठळक करतो. काही नाट्यपदं पाहताना डोळ्यांत अक्षरशः पाणी येतं आणि ते सिनेमातलं नाटकही पेक्षकाला जिंकून घेतं.

एकूणच या सुपरस्टारचा प्रवास अचंबित करतो. चटका लावतो आणि एक उत्तम कलाकृती पाहिल्याचा आनंद देतो. या सिनेमाची लांबी जरा कमी करता आली असती किंवा नाटक सिनेमाच्या जगाबाहेरचं-प्रेक्षकांचं जगही आणखीन चांगलं दाखवता आलं असतं. पण तरीही हा सिनेमा खरंच चांगला वठलाय. याबद्दल दिग्दर्शक, लेखक, कलादिग्दर्शक, अभिनेते अशा सगळ्यांचंच अभिनंदन…!

एका दिग्गज कलाकाराला जाणून घेण्यासाठी आणि दर्जेदार करमणुकीसाठी हा सिनेमा सिनेनाट्यप्रेमींनी नक्की पाहायला हवा.

दर्जा       :            *** 1/2

सिनेमा    :           आणि डॉ. काशीनाथ घाणेकर

निर्माता    :          सुनील फडतरे

दिग्दर्शक/ कथा/पटकथा         :            अभिजित देशपांडे

संवाद      :           गुरू ठाकूर

संगीत     :           अजित परब

छायांकन  :           सुधीर पळसाणे

कलाकार  :           सुबोध भावे, प्रसाद ओक, सुमित राघवन,  नंदिता पाटकर धुरी,

प्रभाकर पळशीकर,  सोनाली कुलकर्णी,  आनंद इंगळे, मोहन जोशी.