मनाचा ठाव घेणारे मनाचे खेळ

1865

>> क्षितीज झारापकर

‘थोडं तुझं थोडं माझं’ सुयोगचं नवीन नाटक. सुयोगच्या नाटकांभोवती नेहमीच स्वतःचं एक वलय असतं. वेगळय़ा अपेक्षा असतात. हे नाटकही या साऱया अपेक्षांना उतरले आहे.

व्यावसायिक नाटकं आणि सिनेमांना एक विलक्षण शाप मिळालेला असतो. अपेक्षापूर्तीचा शाप. नाटक, सिनेमा कोणत्याही भाषेतले असोत हा शाप व्यावसायिकतेच्या निकषांवर चुकत नाही. प्रेक्षक, दिग्दर्शक, निर्माता किंवा नट, नटय़ांच्या भोवती काही ठोकताळेबंद अपेक्षा घेऊन येतात. या क्षेत्रात कार्यरत असलेल्या रंगकर्मींनादेखील याची कल्पना असते आणि ही मंडळी जाणीवपूर्वक आपल्या चाहत्यांची अपेक्षा सातत्याने पूर्ण करीत असतात. पण शेवटी कलाकारदेखील माणूस आहे आणि आपण आपल्या कार्यक्षेत्रात वेगळं काहीतरी करून पाहूया ही इच्छा त्यांच्या मनात येणं ही स्वाभाविक आहे. असं झाल्यावर मग प्रेक्षकांच्या अपेक्षेपेक्षा वेगळीच कलाकृती निर्माण होते. काही वेळा असे प्रयत्न प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरत नाहीत, पण अनेकदा असे प्रयत्न अजरामर कलाकृती देऊन गेल्या आहेत. सध्या ‘सुयोग’ या नाटय़संस्थेने असाच एक विलक्षण सुखद धक्का देण्यासाठी एक नवीन कोरं करकरीत नाटक बाजारात उतरवलंय. ‘थोडं तुझं थोडं माझं’ हे ते नवीन नाटक.

‘थोडं तुझं थोडं माझं’ हे एक मानसिक विकारावर बेतलेलं नाटक आहे. कित्येक वर्षे एकटय़ाने संसाराचा गाडा रेटणाऱया व्यक्तीच्या मनावर त्या क्रियेचा कसा परिणाम होत असेल आणि त्या संसारात अडकलेल्या दुसऱया व्यक्तीला जेव्हा संसारात व्हॉईस प्राप्त होईल तेव्हा त्या संसाराचं गणित काय होईल असा जबरदस्त वेगळा विषय घेऊन ‘थोडं तुझं थोडं माझं’ आपल्यासमोर उभं ठाकतं. अभिजित गुरू या मराठी मालिका लिहिणाऱया अग्रगण्य लेखकाने हे नाटक लिहिलं आहे. मुख्य म्हणजे, मालिका आणि नाटक ही दोन भिन्न माध्यमं आहेत याचं पूर्ण भान ठेवून अभिजीतने ‘थोडं तुझं थोडं माझं’ क्राफ्ट केलंय म्हणून त्याचं कौतुक करायलाच हवं. मालिका या अतिरंजित प्रसंगातून आणि मोजक्या लांबीच्या प्रसंगातून रंगवायच्या असतात आणि नाटक हे एखाद्या संगीताच्या बंदिशीप्रमाणे ठेहराव घेत बांधायचं असतं हे अभिजित गुरू याला कळलेलं आहे. दोन्हींची काही बलस्थानं आहेत. अभिजितने त्या बलस्थानांचा ‘थोडं तुझं थोडं माझं’ नाटकाची परिणामकारकता वाढवण्यासाठी पुरेपूर वापर केला आहे आणि इथे तो जिंकलेला आहे. सुयोगच्या संदेश भटचं अभिनंदन अशासाठी की, त्याने त्यामानाने नवीन नाटककाराचं नाटक स्वप्नील बारसकर या अवघ्या अठरा वर्षांच्या दिग्दर्शकाच्या हातात दिलं आहे. या आधी ‘श्यामची आई’ या एकांकिकेमुळे गाजलेला स्वप्नील पुढे त्याच एकांकिकेचं पूर्ण नाटक घेऊन उभा राहिला होता. इथे स्वप्नील आपल्या विचारांची झेप दाखवण्यात पूर्णपणे यशस्वी झालाय. मानसिक विकारांवर बेतलेलं पूर्णपणे मनोवैज्ञानिक नाटक त्याने भन्नाट प्रगल्भतेने हाताळून दाखवलेलं आहे.

संजय नार्वेकर हे नाव मराठी इंडस्ट्रीमध्ये खऱयाखुऱया सेलिब्रिटींमध्ये मोडतं. संजय हा मुळात एक अत्यंत समंजस आणि हुशार रंगकर्मी आहे. त्याला आपल्या छबीची, प्रेक्षकांची आपल्याकडून असणाऱया अपेक्षेची पूर्ण जाणीव आहे आणि सातत्याने तो ती पूर्ण करत असतो. कलाकार म्हणून त्याला त्याच्या स्वतःच्या गरजाही ज्ञात असतात आणि अधूनमधून संजय नार्वेकर अत्यंत आशयघन आणि वेगळी नाटकं करून त्याही पूर्ण करत असतो. पण ‘थोडं तुझं थोडं माझं’ं हे नाटक दोन्ही बाबतीत पूरक आहे. हे नाटक प्रेक्षकांना भावणारं आहे आणि संजयला एका वेगळ्या पठडीतला अभिनय केल्याचं समाधान देणारं तर आहेच, पण त्याचबरोबर हे नाटक संजय नार्वेकर हा किती ताकदीचा अभिनेता आहे हे पुन्हा एकदा रसिकांना दाखवून देणारं आहे. ‘थोडं तुझं थोडं माझं’मध्ये दुसऱया अंकात एक बिंदू असा येतो जिथे प्रेक्षकांची प्रचंड दाद येते. सर्वसाधारणपणे मिळणारी दाद एका नटाच्या पंचला किंवा वाक्याला असते, अथवा दुसऱया नटाच्या रिऍक्शनला असते किंवा लेखकाच्या वाक्याला असते. इथे मिळणारी दाद ही लेखकाच्या रचनेला, एका नटीच्या बदलल्या ऑटिटय़ूडला आणि संजयच्या मूकाभिनयातून दिलेल्या एक्स्प्रेशनला एकत्रित मिळते. ‘थोडं तुझं थोडं माझं’ जिंकतं ते या सांघिक यशामुळे. समिधा गुरू या अभिनेत्रीने संजयला नाटकात पदोपदी तोलामोलाची साथ देत नाटक खूपच लक्षणीय करण्यात मदत केली आहे. समिधाने दोन अंकांमध्ये वेगवेगळं बेरिंग साधलं आहे. दोन्ही बाजांमध्ये कमालीचा फरक तिने साधला आहे. प्रसाद आठल्ये याने साकारलेला डॉक्टर हा तंतोतंत डॉक्टर वाटतो. जवळचा डॉक्टर. हा नाटक, सिनेमामध्ये डॉक्टर कमी आणि मित्र अधिक वाटतो. तसं इथे होत नाही हे प्रसादचं श्रेय आहे. वनिता खरात ही एक गुणी अभिनेत्री नुकतीच मराठी कलविश्वाला लाभली आहे. इथे तिने मोलकरीण सुमन साकारली आहे. इथे सुमन टाळ्या घेते आणि तिथेच ‘थोडं तुझं थोडं माझं’ नाटक म्हणून श्रेष्ठ ठरतं.

निर्मिती मूल्यांमध्ये नाटक कुठेचं कमी पडत नाही. संदेश बेंद्रे यांचं नेपथ्य दिवसागणिक अधिकाधिक देदीप्यमान होत चाललंय. इथे त्यांनी उभं केलेलं घर नाटकाला पूरक तर आहेच, पण पात्रांच्या हालचालींसाठी अत्यंत योग्य आहे. अभिजित पेंढारकरचं संगीत आणि भूषण देसाईची प्रकाशयोजनाही तशीच परिपूर्ण आहे. सायली अमोल जोशी आणि कांचन सुधीर भट निर्मित ‘थोडं तुझं थोडं माझं’ हे एक अत्यंत सुबक, लाक्षणिक आणि मनोरंजक असं नाटक आहे.

नाटक थोडं तुझं थोडं माझं
निर्मिती सुयोग, अमोल जोशी प्रॉडक्शन
सादरकर्ते संदेश भट
लेखक अभिजित गुरू
नेपथ्य संदेश बेंद्रे
संगीत अभिजीत पेंढारकर
प्रकाश भूषण देसाई
वेशभूषा विजय भाईगडे
रंगभूषा संदीप नगरकर
निर्माते कांचन भट, सायली जोशी
दिग्दर्शक स्वप्निल बारसकर
कलाकार समिधा गुरू, वनिता खरात, प्रसाद आठल्ये, संजय नार्वेकर
दर्जा – तीन स्टार

आपली प्रतिक्रिया द्या