
सामना ऑनलाईन । मॅक्सिको
लहान-मोठ्याबॅटरी काम झाल्यावर आपण फेकून देतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कचरा वाढून पर्यावरणाला धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संशोधकांनी बॅटरींवर पुनर्प्रक्रिया करून ती पुन्हा वापरता येईल, याबाबतचे यशस्वी संशोधन केले आहे. बॅटरीतील महत्त्वाचे घटक विरघळून टाकणारे सोलव्हंट म्हणजे विद्रावक तयार केले आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रॉनिक बॅटरींचा कचरा वाढणार नाही, अशा विश्वास संशोधकांना वाटत आहे.
अमेरिकेच्या राईस विद्यापीठाने बॅटरींच्या रिसायकलिंगवर महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. संशोधकांनी तयार केलेले द्रावक हे बॅटरीतील मेटल ऑक्साईडमधून महत्त्वाचे घटक काढून घेते. हे द्रावक कोलीन क्लोराईड आणि इथिलिन ग्लायकॉल यांच्यापासून तयार केलेले आहे. रिसायकलिंग प्रक्रिया याआधी ऑसिडच्या सहाय्याने करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ती प्रक्रिया इकोफ्रेंडली नव्हती. तसेच त्यासाठी खूप खर्च होता आणि कामगाऱयांच्या जिवालाही धोका होता. हे लक्षात घेऊन संशोधकांनी काम सुरू ठेवले होते. त्यातून पर्यावरणाला हानी पोचवणार नाही आणि बॅटरीतील अर्क काढून घेईल, असे विद्रावक संशोधकांनी तयार केले आहे.
मोबाईल बॅटरीतील कोबाल्ट दुर्मिळ
कोबाल्ट हा दुर्मिळ धातू आहे. मोबाईलच्या बॅटरीतही ते खूप वापरले जाते. निसर्गाच्या दृष्टीने कोबाल्ट साठवणे खूप आवश्यक आहे. आता बॅटरींचे रिसायकल करून कोबाल्ट परत मिळवता येईल, असा विश्वास संशोधक मारको रोड्रिग्ज यांनी व्यक्त केला. प्लॅस्टिक कचऱयाप्रमाणे रिचार्जेबल बॅटरींचा कचरा हे मोठे आव्हान आहे. सर्वसाधारपणे लिथियम आयन बॅटरीचा जास्त वापर होतो. या बॅटरींचा वापर इलेक्ट्रिक वाहनं आणि अन्य गॅझेटमध्ये फार मोठ्याप्रमाणात होतो.

























































