
कोविडच्या दुसऱया लाटेनंतर परवानाधारक ऑटो रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून 1500 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला होता. हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वळते करण्यासाठी परिवहन विभागाने एका मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे. त्यासाठी परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाइन अर्ज कसा करायचा याचे राज्यातील सर्व जिह्यांतील रिक्षा संघटना प्रतिनिधींसमोर शुक्रवारी ऑनलाइन सादरीकरण करण्यात आले. उद्या शनिवार, 22 मेपासून राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना अनुदानप्राप्तीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असून आरटीओच्या वेबसाइटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
कोविड काळात राज्यातील परवानाधारक ऑटो रिक्षाचालकांना 1500 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने निधीही मंजूर केला आहे. परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत परवानाधारक रिक्षाचालकांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या ऑनलाइन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. यासंदर्भात आयसीआयसीआय बँकेशी करार झाला असून उद्या शनिवार, 22 मेपासून रिक्षाचालकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. परिवहन विभागाला ही प्रक्रिया लवकरात लवकर राबवायची आहे. त्यामुळे रिक्षा संघटनांनी रिक्षाचालकांना अर्ज करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या रिक्षाचालकांच्या बँक खात्याचा क्रमांक आधारकार्डशी संलग्न असेल त्यांच्या खात्यात तातडीने रक्कम जमा होणार असल्याची माहिती राज्य परिवहन आयुक्त कार्यालयाने दिली आहे.



























































