रिस्की ड्रायव्हिंगमुळे जगातील सर्वाधिक रस्ते अपघात हिंदुस्थानात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धोकादायक ड्रायव्हिंगमुळेच जगातील सर्वाधिक रस्ते अपघात हिंदुस्थानात होतात असे पवई येथील आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे. देशात दरवर्षी दीड लाख रस्ते अपघात होतात तर दररोज सुमारे पंधरा बालकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. वेगवान ड्रायव्हिंग, खराब रस्ते आणि वाहतुकीच्या नियमांची सक्तीने होत नसलेली अंमलबजावणी हे घटक याला जबाबदार आहेत असे या संशोधन अहवालात म्हटले आहे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी चालकांना मार्गदर्शन करणारी अद्ययावत ‘अडास’ यंत्रणा देशातील प्रत्येक वाहनात लावली गेली पाहिजे असा सल्लाही संशोधकांनी या अहवालात दिला आहे.

आयआयटी मुंबईतील डॉ. अॅना चार्ले आणि प्रा. टॉम मॅथ्यू या संशोधकांनी हा अहवाल बनवला आहे. देशात होणाऱया रस्ते अपघातांची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी या संशोधनात केला आहे. विकसित देशांमधील वाहन कंपन्या वाहनांमध्ये अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्ट सिस्टम (अडास) लावतात. त्यात स्वयंचलित ब्रेकिंग, अपघाताच्या शक्यतेची पूर्वसूचना आणि लेनबाबत मार्गदर्शन मिळते.

हिंदुस्थानी चालकांसाठी स्वतंत्र सुरक्षा यंत्रणेची गरज

परदेशात वापरली जाणारी ‘अडास’ यंत्रणा हिंदुस्थानात उपयोगी पडणार नाही. कारण देशातील रस्त्यांची अवस्था, वाहतूक व्यवस्था आणि चालकांची मानसिकता याआधारे ही यंत्रणा विकसित केली जाते. हिंदुस्थानातील वाहतूक परिस्थिती पाहता इथे नवी ‘अडास’ यंत्रणा विकसित करावी लागेल असे संशोधकांचे म्हणणे आहे.

लेन तोडणे, ओव्हरटेकिंगमुळे देशात रस्ते अपघात

लेन तोडणे आणि ओव्हरटेकिंग ही हिंदुस्थानातील रस्ते अपघाताची प्रमुख कारणे आहेत असे डॉ. चार्ले यांनी या अहवालात म्हटले आहे. संशोधन करताना त्यांनी चालकांची मानसिकता, रस्त्यांची वळणे, उतरण असलेले रस्ते आणि वेळ हे घटक ध्यानात घेतले. 94 किलोमीटर लांबीच्या मुंबई-पुणे एक्प्रेस महामार्गाची त्यांनी या अभ्यासासाठी निवड केली.

खासगीपेक्षा सार्वजनिक वाहनांचे सुरक्षेला प्राधान्य

हा अभ्यास एक्प्रेस महामार्गावर करण्यात आला असला तरी त्यातून निघणारे निष्कर्ष हे शहरांतील रस्त्यांनाही लागू पडतात. कारण प्रत्येक ठिकाणी वाहन चालकांची वाहने चालवण्याची मानसिकता मात्र समानच असते असे डॉ. चार्ले सांगतात. वाहन कोणत्या प्रकारचे आहे त्यावरही चालकाची मानसिकता अवलंबून असते. सार्वजनिक वाहनांचे चालक प्रवाशांच्या सुरक्षेची अधिक काळजी घेतात. कार चालकांची मानसिकता आणि दुचाकी व ट्रकचालकांची मानसिकता यामध्येही फरक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.