
अभिनेता रितेश देशमुख हा बॉलिवूडमधील सर्वात अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहे. आपल्या आतापर्यंतच्या अभिनयाच्या कारकिर्दीत रितेशने विनोदी, रोमँटिक ते खलनायक अशा दमदार भूमिका साकारुन आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. अभिनयाबरोबरच त्याने दिग्दर्शन क्षेत्रात देखील उत्तम कामगिरी केली आहे. त्याच्या ‘वेड’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले. ‘वेड’च्या यशानंतर आता रितेश आणखी एका चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याच्या तयारीत आहे. रितेशने नुकतंच त्याच्या नव्या चित्रपटाची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.
‘राजा शिवाजी’ हा रितेश देशमुख दिग्दर्शित चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेशच्या या नव्या चित्रपटामुळे पुन्हा एकदा शिवरायांचा इतिहास हा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटातील संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अजय-अतुल यांनी पेलवली आहे. तसेच ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी निर्मिती केलीये. या चित्रपटाचे छायांकन संतोष सिवन यांनी केलंय. हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.
View this post on Instagram
इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जीचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं. छत्रपती शिवाजी महाराज.. फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तिनशे वर्षांपासून.. प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे.शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला. एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं …आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे….’राजा शिवाजी’, अशी पोस्ट करत रितेशने छत्रपती शिवाजी महारांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे.
मुंबई फिल्म कंपनी आणि जिओ स्टुडिओ यांची निर्मिती असून स्वत: रितेश देशमुख याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पण या पोस्टवरुन महाराजांच्या भूमिकेत नेमकं कोण दिसणार की रितेश स्वत: छत्रपतींची भूमिका साकारणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.






























































