
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नते लालकृष्ण आडवाणी यांना तिकीट मिळाले नसल्याने सर्वच पक्षांमध्ये याबाबतची चर्चा सुरू आहे. गांधीनगरमधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना तिकीट दिल्यानंतर लालकृष्ण आडवाणी यांनी ब्लॉग लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आधी देश, नंतर पक्ष आणि त्यानंतर मी असे त्यांनी ब्लॉगमध्ये नमूद केले आहे. विरोधी पक्षांना आपण कधीही शत्रू किंवा देशद्रोही मानले नाही असेही त्यांनी म्हटले आहे. या ब्लॉगनंतर विविध पक्षांच्या नेत्यांनी आडवाणी यांच्याबाबत आदर व्यक्त करत त्यांना पक्षात आदराची वागणूक देण्यात येत नसल्याचा आरोप करत भाजपवर टीका केली आहे. याबाबत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आडवाणी ज्येष्ठ नेते असल्याने त्यांच्याबाबत आपल्याला आदर आहे. पक्षाला बळकटी देणाऱ्या ज्येष्ठ नेत्याचा सल्ला मानण्यात येत नसेल, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असेल तर हे दुर्दैवी आहे, असे वढेरा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. भाजपचे आधारस्तंभ बनून पक्षाला बळकटी देऊन उच्च स्थानावर नेण्यात आडवाणी यांचा मोलाचा वाटा आहे. ते त्यांची धोरणे आणि प्रशासनाची जाण यासाठी नावाजले जातात. त्यांना योग्य तो सन्मान आणि आदर मिळायला हवा. पक्षात त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. पक्षातील ज्येष्ठांना बाजूला करून त्यांचा सल्ला डावलणे खेदजनक असल्याचे वढेरा यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ नेते म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो, मात्र, त्यांच्या पक्षालाच त्यांचे विस्मरण झाले आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या ब्लॉगनंतर अनेक नेत्यांनी आडवाणी यांच्याबाबत आदर व्यक्त करत भाजपवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राजकीय गुरुसाठी काय केले, हिंदू संस्कृतीत गुरूला कशी वागणूक देण्यात येते, गुरूकडे दुर्लक्ष करणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी जनतेला हिंदू धर्म शिकवू नये अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. या ब्लॉगमधून आडवाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अशा ज्येष्ठ नेत्याकडे दुर्लक्ष होणे दुर्दैवी असल्याचे सांगत भाजपने त्यांचा योग्य तो आदर करावा अशी अपेक्षा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.
























































