आधुनिक अनाजी पंत महाराष्ट्र धर्म संपवत आहेत , फडणवीसांचे नाव न घेता रोहित पवारांची तिखट शब्दांत टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इतिहासात मराठेशाही एका अनाजी पंतांनी संपवली. आता महाराष्ट्र धर्म संपवण्याचे काम एका आधुनिक अनाजी पंतांकडून केले जात आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट नाव न घेता जोरदार टीका केली. रोहित पवार सध्या आपल्या युवा संघर्ष यात्रेवर आहेत. मंगळवारी रोहित पवार यांनी ‘एक्स’वरून फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

रोहित पवार यांनी आज ट्विट केले असून यात म्हटले की, युवा संघर्ष यात्रेत 450 किमी पायी चालल्यानंतर एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पूर्वीच्या काळात मराठेशाही एका अनाजी पंतांनी संपवली. आताच्या काळात महाराष्ट्र धर्म संपवण्याचे काम एक आधुनिक अनाजी पंत करीत आहे. राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षांकडून फडणवीस यांचा उल्लेख सातत्याने अनाजी पंत केला जात आहे. आता रोहित पवारांनी अनाजी पंताचा उल्लेख केल्याने ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पदयात्रेत ते वेगवेगळय़ा गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत.