
सामना ऑनलाईन। चैन्नई
वेस्ट इंडिज संघ दुबळा असूनही हिंदुस्थानी दौऱ्यात त्यांनी टीम इंडियाला दिलेली लढत खरेच कौतुकास्पद आहे. आम्ही त्यांच्याविरुद्ध टी-२० मालिका ३-० अशी जिंकल्याचा आनंद आहे .पण आता हिंदुस्थानी संघाचा खरा कस लागणार आहे तो ऑस्ट्रेलियन दौऱ्यात. कारण तिथल्या वेगवान उसळत्या खेळपट्ट्यांवर खेळणे हि आमच्यासाठी मोठी कसोटीच ठरणार आहे, अशी सूचक प्रतिक्रिया टीम इंडियाचा हंगामी कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केली.
रविवारी चेन्नईतील रोमहर्षक टी -२० लढतीत हिंदुस्थानने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत पाहुण्या वेस्ट इंडिजला तीन लढतीच्या मालिकेत ३-० असा व्हाईटवॉश दिला. टीम इंडियाचा हा विजय प्रेरणादायी आहे असे सांगून रोहित म्हणाला ,हिंदुस्थानी उपखंडातील खेळपट्ट्या आणि ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना तेथे यशासाठी प्रचंड संघर्ष करावा लागेल. अर्थात विंडीजसारख्या टी-२० विश्वविजेत्या संघाला पराभूत केल्यावर आमचा आत्मविश्वास वाढला आहे. कामगिरीत सातत्य राखून आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्धही चमकदार कामगिरी करू असा विश्वासही रोहितने व्यक्त केला.
शिखरला सूर गवसला हि मोठी आनंदाची बाब
धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनला या मालिकेत विशेष यश लाभत नव्हते हि आमच्यासाठी चिंतेची बाब होती.पण अखेरच्या टी-२० लढतीत त्याला पुन्हा सूर गवसला हि आमच्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही तो आपला धडाका असाच कायम राखेल असा विश्वासही रोहितने व्यक्त केला.
“व्हाईटवॉश” लाजिरवाणाच ,पण हिंदुस्थानी संघाला झुंज दिल्याचे समाधान -ब्रेथवेट
टी-२० मालिकेत ३-० अशा फरकाने व्हाइवॉश घेणे हे माझ्यासाठी कर्णधार म्हणून वाईट आणि लाजिरवाणे आहे. पण आमची कामगिरी आणि आम्ही बलाढ्य हिंदुस्थानी संघाला दिलेली झुंज ही समाधानाची बाब आहे. आम्ही संघ म्हणून एकत्रित आलो आणि आमच्या संघातील खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला हेच माझ्यासाठी महत्वाचे ठरले.आमच्या खेळाडूंनी यजमानांना सहज जिंकू दिले नाही हीच आमची जमेची बाजू आहे ,अशी भावना वेस्ट इंडियन कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने संघाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारताना बोलून दाखवली.
























































