रोखठोक : बकऱ्या जिवंत, गोसावी मेले!

rokhthokमहाराष्ट्रात माणूसच माणसाला खाऊ लागला आहे. जैन समाजाच्या नेत्यांनी दबाव टाकला म्हणून १५०० बकऱ्यांचे प्राण सरकारने नागपूर विमानतळावर वाचवले. त्याच महाराष्ट्रात गोसावी समाजाच्या ५ गरीबांना जमावाने ठेचून मारले. साक्रीच्या राईनपाड्यात जे घडले ते मानवतेला कलंकच आहे!

महाराष्ट्राच्या इभ्रतीस कलंक लावणाऱ्या घटना अलीकडे सातत्याने घडत आहेत. मोठा मासा लहान माशाला खातो. वाघ, सिंह हे हरणांची, बकऱ्यांची शिकार करतात, पण इथे माणूसच माणसाला खाऊ लागला आहे. हे देशभरात घडत असले तरी आपण महाराष्ट्राचा विचार करायला हवा. तो यासाठी की, इतर राज्यांत शिवाजी महाराज जन्मास आले नाहीत. फुले, शाहू, आंबेडकर, गाडगे महाराज महाराष्ट्रातच जन्मास आले. त्या आपल्या महाराष्ट्रात साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे मुले पळविणारे गावात आले समजून जमावाने पाच जणांची हत्या केली. एका विशिष्ट जातीच्या लोकांनी विहिरीत पोहण्यासाठी उड्या मारल्या म्हणून त्यांची नग्न धिंड काढण्यात आली. कुठे आजही स्पृश्य-अस्पृश्यतेची प्रकरणे घडताना दिसत आहेत. हे सर्व थांबावे, मराठी म्हणून समाजाने एकसंध राहावे. त्या एकसंध समाजाचे नेतृत्व करणारा नेता आज तरी दिसत नाही. बाळासाहेब ठाकरे हे शेवटचे.

राजकारण्यांचे अपयश
धुळ्यातील पाच जणांचे हत्याकांड हे गेल्या पन्नास वर्षांतील सर्व राजकारणी आणि सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. कारण ‘गरिबी हटाव’, ‘अच्छे दिन’चे फक्त नारे दिले, पण जात व शोषण हाच सगळय़ांच्या राजकारणाचा पाया राहिला. गरिबी, बेरोजगारी, आर्थिक विषमता यातून जातीयतेचा वणवा जास्त भडकतो. आमच्या राज्यकर्त्यांनी हे कधीच विचारात घेतले नाही. ‘मराठा’, ‘धनगर’ हे सर्व आकड्याने मोठे असलेले ‘मराठी’ समाज रस्त्यावर उतरून त्याच विषमतेच्या विरोधात संघर्ष करतात, हे अपयश कोणाचे? साक्रीतील राईनपाड्यातील पाच जणांचे हत्याकांड हा त्याच गरिबी आणि बेरोजगारीचा उद्रेक होता. लोकांचे हात आणि डोकी रिकामी आहेत. त्या रिकाम्या डोक्यात सैतान घर करतो. हातांना काम नाही. मग तो वर्ग अफवा, असत्याच्या मागे धावतो. हिंसा करतो. हत्या करतो. साक्रीत ज्या पाच जणांची हत्या झाली ते सगळे ‘गोसावी’ समाजाचे लोक होते. भिक्षा मागून जगणारे, गावागावात ज्योतिष सांगून जगायचे हा त्यांचा परंपरागत व्यवसाय. गावागावात भिक्षा मागत त्यांना आजही फिरावे लागते. हे स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनंतरही सुरूच असेल तर स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, पण मोठय़ा समाज घटकाच्या झोपड्यांतील अंधार संपलेला नाही असेच म्हणावे लागेल. ब्राह्मण समाजदेखील कधीकाळी भिक्षुकी करून जगत होता, पण तो समाज इतिहासात आणि स्वातंत्र्यानंतरही ‘राज्यकर्ता’ म्हणून वावरला. पंतप्रधानपदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत सर्व पदांवर या समाजाचे लोक राहिले. वीर सावरकरांपासून, टिळक, फडके, चापेकरबंधू असे असंख्य क्रांतिकारक ब्राह्मण समाजाने दिले. ते फासावर गेले. अर्थात शिवरायांपासून स्वातंत्र्यलढ्यांपर्यंत गोसावी, पारधी, आदिवासी, समाजानेही तितकाच त्याग केला आहे. मात्र त्यांना त्यांचा वाटा मिळाला नाही. अठरापगड जातीतल्या चार जाती पुढे गेल्या. बाकीचे ‘चौदा’ भिकारी राहिले. जात म्हणून ‘गुन्हेगारी’चा शिक्का या समाजावर बसला तो आजही पुसता आलेला नाही. ‘गुन्हेगारी’ हाच त्यांचा आजही ‘व्यवसाय’ असेल तर स्वातंत्र्याने त्यांना काय दिले, हा प्रश्न पडतो. आजही ग्रामीण भागात चोऱ्यामाऱ्या झाल्या की पारधी समाजाच्या पोरांना उचलले जाते व खोट्या गुन्ह्यात अडकवून सडवले जाते. त्यांच्यासाठी ‘आवाज’ उठविणारा, विधानसभा, लोकसभेत लढणारा कोणी नाही. हे समाज इतके अल्पसंख्याक की, मतांच्या बेरजेत ते बसत नाहीत. त्यांच्या घरादारांचा पत्ता नसल्याने ते मतदार यादीत नाहीत. त्यामुळे राजकारण्यांसाठी ते कामाचे नाहीत. स्वातंत्र्य, मानवता आणि लोकशाहीची ही शोकांतिका आहे. ज्या ‘गोसावी’ समाजाचे पाच लोक साक्रीत मारले गेले त्यांनी ‘टाहो’ फोडायचा ठरवला तरी ५०० लोक जमणार नाहीत. मोर्चा काढायचा ठरवले तर दोन हजारांवर लोक जमणार नाहीत. त्यामुळे त्यांचा टाहो हवेतच विरून जातो.

बकऱ्या की माणसं?
समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. लोकशाहीची हीच संकल्पना असावी, पण जातीची, धर्माची गर्दी बघून न्याय केला जातो. जैन समाजाच्या धर्मगुरूंनी विरोध केला म्हणून आखातात पाठवल्या जाणाऱया १५०० बकऱ्यांची ‘निर्यात’ सरकारने थांबवली. १५०० बकऱ्यांचे प्राण वाचवले, पण त्या बकऱ्यांच्या मानेवर कधीच सुरी फिरणार नाही व बकऱ्या शंभर वर्षे जगवू अशी गॅरंटी जैन मुनींना सरकारने दिली आहे काय? आमच्या देशात बकऱ्यांचे प्राण वाचवले जातात, पण माणसे निर्घृणपणे मारली जातात. जनावरांचे हाल मनेका गांधी व न्यायालयास पाहवत नाहीत, पण माणसांचे हाल व हत्या उघड्या डोळ्याने पाहिल्या जातात. पारधी समाजावर सरकार दप्तरी गुन्हेगारी व्यवसायाचा शिक्का बसला आहे. तो पुसून टाका, नाही तर आम्हाला रीतसर ‘चोरी’चा परवाना द्या, असा अर्ज लेखक लक्ष्मण माने यांनी सरकारदरबारी करताच लोकांनी त्यांना मूर्ख ठरवले; पण ते शहाणे होते हे धुळ्यात गोसावी समाजाच्या हत्याकांडावरून समजले.

समाज चोर कसा?
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील एक समाज ‘चोर’ हा शिक्का घेऊन जगतो. दुसरा समाज ‘भिकारी’ म्हणून जगतो. जो सधन आहे, म्हणजे शेतकरी आहे. तो आत्महत्या करतो. तरीही राज्याचे व देशाचे उत्तम चालले आहे. पंतप्रधान मोदी यांनी चार दिवसांपूर्वी सांगितले, आतापर्यंत (चार वर्षांत) ७० लाख लोकांना नोकऱ्या दिल्या. या नोकऱ्या गोसावी, पारधी अशा शेवटच्या घटकापर्यंत गेल्या नसतील तर ७० लाखांचा आकडा झूट आहे. धुळ्यात जे पाच लोक मारले गेले त्यांना काम नव्हते म्हणून ते भीक मागत होते व ज्यांनी या गोसाव्यांना मारले त्यांचे हात व डोके रिकामेच होते, म्हणून ते सैतानाचे हस्तक झाले. राम मनोहर लोहिया एकदा म्हणाले, जोपर्यंत ‘भूक’ आहे तोपर्यंत माणूस सैतान बनत राहील.

साक्रीच्या राईनपाड्यात वेगळे काय घडले?

बकऱ्यांसाठी अच्छे दिन आलेच आहेत. त्या अच्छे दिनांसाठी पाच गोसाव्यांचे हौतात्म्य कामी आले.

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या