रोखठोक – चुंबन, भीती आणि ‘नाटू नाटू’!

महाराष्ट्रात ‘चुंबना’वर चर्चा सुरू आहे. शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. देशात ईडी, सीबीआयने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. गौतम अदानीच्या विरोधात वातावरण तापले आहे. त्यावर पाणी टाकण्यासाठी विरोधकांच्या घरांवर धाडी व अटका सुरू आहेत. सगळाच ‘नाटू नाटू’चा प्रकार.

हा मजकूर लिहीत असताना सीबीआयचे पथक लालू यादव यांच्या घरी पुन्हा पोहोचले आहे. किडनीच्या विकारामुळे लालू यादव यांचा आवाज क्षीण झाला आहे. त्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. त्याही अवस्थेत त्यांनी मोदी सरकारला सुनावले. ‘मी शेवटपर्यंत लढेन, पण शरण जाणार नाही.’ तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांची कन्या कविता यांना ‘ईडी’ने समन्स पाठवले. त्याच दिवशी मी दूरध्वनीवरून कविता यांच्याशी संवाद साधला. त्या स्पष्टपणे म्हणाल्या, ‘मी गुडघे टेकणार नाही. माझ्यावरील सर्व आरोप बनावट आहेत. मी सत्यासाठी लढत राहीन.’ नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या अवतीभवतीच राजकारण फिरत आहे. विरोधक लढण्याच्या मूडमध्ये आहेतच, पण विरोधकांत अद्यापि एकीचे दर्शन होत नाही. हेच श्री. मोदी व शहांचे बलस्थान आहे. ‘ईडी’सारख्या संस्था कायद्याचा गैरवापर करून विरोधकांना जेरीस आणतात. त्याविरुद्ध सर्व विरोधी खासदारांनी एकत्र येऊन ‘ईडी’ कार्यालयावर मोर्चा काढावा. गौतम अदानी यांनी केलेल्या लुटमारीची तक्रार ‘ईडी’ संचालकांकडे करावी असे ठरले; पण त्या तक्रारीवर ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस व महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसने सह्या केल्या नाहीत. ‘ईडी’वरील मोर्चातही हे पक्ष सामील झाले नाहीत. प्रश्न गौतम अदानी यांचा नसून ज्या पद्धतीने विरोधकांना चिरडले जात आहे तो विषय महत्त्वाचा आहे. तृणमूल आणि राष्ट्रवादीदेखील ‘ईडी’च्या वरवंट्याखाली भरडून निघाली आहे. पोलीस तपास यंत्रणांचा इतका बेगुमान गैरवापर कधीच झाला नव्हता.

क्राऊड फंडिंग!

‘क्राऊड फंडिंग’ व त्या पैशांचा गैरव्यवहार हा मनी लाँडरिंग कायद्याच्या अंतर्गत येणारा विषय. साकेत गोखले हा तृणमूल काँगेसचा प्रवक्ता सध्या याच गुन्ह्याखाली ‘ईडी’च्या अटकेत आहे व चार महिने उलटले तरी त्याला जामीन मिळत नाही. किरीट सोमय्या यांनी ‘विक्रांत युद्धनौका वाचवा’ या मोहिमेखाली लोकांकडून मोठय़ा प्रमाणात ‘क्राऊड फंडिंग’ केले व ते पैसे कोठे वापरले याचा हिशेब दिला नाही. साकेत गोखले यांनी जर क्राऊड फंडिंगचा गुन्हा केला, मग त्याच गुन्हय़ाखाली किरीट सोमय्या मोकळे कसे? त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. सेशन कोर्टाने त्यांना जामीन नाकारला, पण हायकोर्टाने त्यांना जामीन दिला व फडणवीस गृहमंत्री होताच विक्रांत आर्थिक गैरव्यवहारास ‘क्लीन चिट’ देण्यात आली. विरोधकांना अडकवायचे व सत्ताधारी पक्षाच्या गुन्हेगारांना मोकळे सोडायचे असे ‘कायद्याचे राज्य’ सध्या सुरू आहे. मोदी व शहा सांगतील तीच पूर्व, तोच न्याय, तोच कायदा असे सध्या झाले आहे. कधीकाळी या देशात महान माणसे जन्माला आली याचा विसर पडू लागला आहे. आइनस्टाईनची जयंती नुकतीच साजरी झाली. त्यांनी गांधींविषयी म्हटले ते महत्त्वाचे. ‘गांधी नावाचा माणूस या पृथ्वीतलावर आपली पावले कधीकाळी उमटवून गेला हे पुढच्या काळाला खरेदेखील वाटणार नाही,’ असे अल्बर्ट आइनस्टाईन सांगून गेले ते मोदी-शहांच्या खिजगणतीतही नसेल. आइनस्टाईन, गांधींपेक्षा आज अदानीचे साम्राज्य राज्यकर्त्यांना महत्त्वाचे वाटते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख लोक आजही आणीबाणीत इंदिरा गांधी यांनी देशाचा कसा जेलखाना केला त्यावर प्रवचने देतात. मग आज भाजपच्या राजवटीत जेलखान्याचे नक्की कोणते स्वरूप संघाला दिसते? नको असलेले विरोधक तुरुंगात टाकायचे हा फॅसिजम आहे. संघाच्या लोकशाही परंपरेत हे बसते काय? मोदी-शहा यांना नकोसे झालेले शेकडो राजकीय विरोधक आज जेलखान्यात बंदीवान आहेत. श्री. राहुल गांधी यांनी लोकशाहीच्या या मृतप्राय अवस्थेवर प्रश्न विचारले तेव्हा सगळ्यांनीच त्यांना घेरले, पण राहुल गांधीही मागे हटायला तयार नाहीत हे महत्त्वाचे.

सर्वच बेकायदेशीर

महाराष्ट्राचे सरकारही मोदींप्रमाणे बेकायदेशीर पद्धतीनेच राजशकट चालवीत आहेत. शिवसेनेच्या शाखांत पोलीस घुसवून शिंदे गटाचे लोक ताबा मिळवत आहेत. पैसा व पोलिसी बळाचा वापर करून कार्यालयांवर ताबा मिळवाल, पण जनभावना कशी विकत घेणार, हा प्रश्न आहे. महाराष्ट्रात एका जाहीर चुंबनाचे प्रकरण सध्या सगळ्यांचेच मनोरंजन करीत आहे. शिंदे गटाच्या एका आमदाराने त्यांच्याच महिला पदाधिकाऱ्याचे जाहीर चुंबन घेतले. त्या नाजूक चुंबनाचे राजकीय पडसाद उमटत आहेत. हे चुंबनाचे जिवंत दृश्य समाजमाध्यमांतून लगेच जगभर पोहोचले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत हे चुंबन प्रकरण घडले. आता या चुंबन प्रकरणात शिवसेनेच्या तरुण कार्यकर्त्यांच्या घरांवर धाडी घालून अटका झाल्या. सध्याच्या युगात प्रत्येक गोष्ट समाज माध्यमातून क्षणात पसरते व त्याचा दोष तुम्ही कुणाला देणार? मुळात चुंबन घेणे हा गुन्हा आहे काय यावर निर्णय व्हायला हवा. चुंबन हा गुन्हा नसेल तर मग शिवसैनिकांना अटक करण्याचे कारण काय? संबंधित आमदार व महिला कार्यकर्त्यास चुंबन प्रकरणाचा मनस्ताप झाला हे मान्य केले तरी, सार्वजनिक ठिकाणी घेतलेले साधे चुंबन हे अश्लील कृत्यात मोडते काय याचा खुलासा व्हावा व अटक केलेल्या शिवसैनिकांची सुटका व्हावी. महाराष्ट्रातील सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून झाले? श्री. एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांनी फडणवीस यांच्याबरोबर सरळ ‘लव्ह जिहाद’चाच प्रकार केला व उघडपणे अनैतिक पद्धतीने एकत्र राहत आहेत, यास काय म्हणावे!

भीतीचे राज्य!

देशात भीतीचे वातावरण आहे. माणसाचे शोषण हे भीतीच्या माध्यमातून केले जाते. आज गुडघे टेकण्याची स्पर्धा त्याच भयातून सुरू आहे. भारतीय जनता पक्षात सामील व्हा, गप्प बसा, नाहीतर तुरुंगात जा, असे सध्या सुरू आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्या चाळीस लोकांवर अशीच भीतीची तलवार टेकवली व त्यांना शरण आणले हे आता लपून राहिलेले नाही. मोदी-शहांचे राजकीय यश हे त्यांनी निर्माण केलेल्या भीतीत आहे. अदानी प्रकरणावर बोलायला भाजपचा एकही सत्यवादी नेता तयार नाही. एलआयसी, बँका सरळ लुटण्यात आल्या; पण भाजपच्या सगळय़ाच नेत्यांनी यावर तोंडास टाळे लावले. श्री. राहुल गांधी यांनी देशातील लोकशाही धोक्यात असल्याचे लंडन येथे केलेले भाष्य भाजपास आवडले नाही व त्यांनी गांधींच्या माफीची मागणी संसदेत केली; पण अदानी प्रकरणाच्या लुटीवर ते गप्प आाहेत. कारण मोदींचे भय त्यांना वाटते. भीतीच्या राज्यात लोकशाही टिकेल काय? चित्र भयावह आहे.

भारतीय जनता पक्षातील ‘अंधभक्तां’चे वेड कोणत्या टोकापर्यंत गेले त्याचे चित्र बुधवारी राज्यसभेत दिसले. ‘नाटू नाटू’ या गाण्यास ऑस्करचा सन्मान प्राप्त झाला. त्यावर अभिनंदनपर भाषणे सुरू झाली. विरोधी पक्षनेते श्री. मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले, ‘‘आता या ऑस्करचे श्रेयही श्री. मोदी यांनी घेऊ नये.’’ श्री. खरगे हे सत्यच बोलले. ‘RRR’ सिनेमातले ‘नाटू नाटू’ हे गाणे. ‘RRR’चे पटकथा लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांना भाजपतर्फे राज्यसभेत खासदार केले गेले. यावर एक मंत्री पियुष गोयल नेमके तेच म्हणाले, ज्याचा उल्लेख श्री. खरगे यांनी केला. ‘मोदी श्वास घेत आहेत म्हणून जग चालत आहे,’ एवढेच सांगायचे बाकी आहे. मोदी म्हणजेच भारत असे बोलणाऱ्यांनी मोदींच्या नावाचेही भयच निर्माण केले.

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]