
नॅशनल हेराल्ड प्रकरणात ई.डी.ने सोनिया व राहुल गांधी यांना नोटीस बजावली. आता या प्रकरणात खुद्द पंडित नेहरूंनाच नोटीस बजावून त्यांच्या स्मारकावर ती चिकटवली तरी आश्चर्य वाटायला नको! हेराल्ड म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचे हत्यार होते. नेहरूंनी ते निर्माण केलं. ती फक्त संपत्ती नव्हती. राजकारणातील सध्याच्या व्यापाऱ्यांना हे कधी समजणार?
नेहरूंनी सुरू केलेल्या नॅशनल हेराल्डचे राजकीय महत्त्व कधीच संपले आहे, पण हेराल्डचे राजकारण मात्र सुरू आहे. नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र पंडित नेहरूंनी सुरू केले होते. इंग्रजांना देशातून हाकलून देणे हा या वृत्तपत्राचा मुख्य उद्देश होता. 1937 साली नेहरूंनी हे पत्र सुरू केले. तेव्हा स्वतः नेहरू, महात्मा गांधी व सरदार पटेल हे या वृत्तपत्राचे मुख्य आधारस्तंभ होते. स्वातंत्र्य लढ्याचे जहाल मुखपत्र म्हणून त्या काळात हेराल्ड लोकप्रिय होते. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यात नेमके काय सुरू आहे, इंग्रज काय करीत आहेत यामागचे सत्य जाणून घ्यायचे असेल तर ‘नॅशनल हेराल्ड’ वाचा असं जगभरात बोलले जात होते. ‘टाइम्स’पासून देशातील अनेक वृत्तपत्रे इंग्रजांचे चरणदासच झाली होती. जालियनवाला बाग हत्याकांडासारख्या घटनांचे एकतर्फी वर्णन ही वृत्तपत्रे देत होती, तेव्हा नेहरूंच्या ‘हेराल्ड’चा सत्यप्रकाशी सूर्य देशात तळपत होता. नेहरूंच्या या वृत्तपत्राचा इंग्रजांनी इतका धसका घेतला की, त्यांनी 1942 च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या वेळी नॅशनल हेराल्डवर बंदीच घातली होती. 1945 पर्यंत या वृत्तपत्रावर बंदी होती. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी या वृत्तपत्राची निर्मिती झाली. लढणाऱ्यांसाठी ते हत्यार होते. त्यास धार होती आणि नीतिमत्ता होती. अर्थार्जनासाठी सुरू केलेला तो व्यवसाय नव्हता. ते स्वातंत्र्य लढ्यासाठी सुरू केलेले एक मिशन होते. आता या वृत्तपत्रातील गैरव्यवहार प्रकरणात सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ‘ईडी’ने समन्स बजावले आहे.
गांधींवर ठपका
‘नॅशनल हेराल्ड’विषयी नव्या पिढीला फारशी माहिती असण्याचे कारण नाही. काँग्रेसच्या नव्या लोकांनाही ती नसावी. सोनिया गांधी व राहुल गांधींवर याप्रकरणी ठपका ठेवला म्हणून ‘नॅशनल हेराल्ड’ काँग्रेस जनांना माहिती झाले, पण नॅशनल हेराल्ड हे एकेकाळी काँग्रेसचे सामर्थ्य होते. नेहरूंचा आत्माच त्यात गुंतला होता. नेहरू हे निर्भीड होते. कोणत्याही टीकेला ते घाबरत नसत. ‘नॅशनल हेराल्ड’ने त्याच स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार केला. त्याचे अनेक किस्से आहेत. नेहरू म्हणजे लोभस व्यक्तिमत्त्व होते.
हल्ली राज्यकर्ते व पत्रकार यांचे तसे कमी जमते, परंतु नेहरूंनीच यासंबंधी काय सांगितले आहे ते आज दिले तर ते उचित ठरावे.
‘‘नेव्हर राइट आऊट ऑफ फियर’’ भीतीपोटी काही लिहू नका, असा नेहरूंचा कायमचा संदेश पत्रकारांना आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात नेहरू ‘नॅशनल हेराल्ड’ या दैनिकाचे व्यवस्थापकीय संचालक होते. कै. चलपती राव हे संपादक होते. ते काँग्रेस पक्षावर टीकाही करीत. त्याबद्दल नेहरूंकडे काँग्रेसजन तक्रारी करीत त्यावेळी नेहरूंनी हे उद्गार काढले. ते पुढे म्हणाले, ‘‘भ्याडपणा हा संसर्गजन्य रोग व गुन्हा आहे. शूर बना आणि नेतृत्व करा. लोक तुमचे ऐकतील. तुम्ही हयगय केलीत की दुसरे थरथर कापायला लागतील, तर काही कोसळतील.’’
लखनौत नेहरू आलेले असताना स्थानिक काँग्रेसजनांनी संधी साधून त्यांच्या कानावर ‘नॅशनल हेराल्ड’बद्दलच्या आपल्या तक्रारी घातल्या. ‘नॅशनल हेराल्ड’ हे काँग्रेस पक्षाचे मुखपत्र असून डोकेदुखी झाली आहे, असे एकाने म्हटले. नेहरू संतप्त झाले. ते म्हणाले, ‘‘तुम्हाला मी काय करायला हवे आहे? संपादकांना बोलावून आपणा सर्वांची सतत स्तुती करा असे मी त्यांना सांगायला हवे आहे? तुमच्या पक्षाच्या दैनिकाचे संपादक चलपती राव हे अतिशय समर्थ पत्रकार आहेत व त्यांची निष्ठा ही संशयातीत आहे! केवळ स्तुतिपाठक म्हणून काम करणाऱ्या संपादकाचा देशाला उपयोग काय?’’
‘नॅशनल हेराल्ड’ला प्रचंड तोटा येत होता. वार्षिक सभेत तोट्याचा विषय सतत येई. नेहरू एकदम म्हणाले, ‘‘तुम्ही तोटा भरून काढू शकत नसाल तर माझे आनंद भवन विकून टाका व ते पैसे ‘नॅशनल हेराल्ड’साठी घ्या!’’
‘नॅशनल हेराल्ड’चे वार्ताहर व नेहरूंबरोबर दीर्घकाळ वावरले अशा पी. डी. टंडन यांच्या पुस्तकात या आठवणी आहेत.
दि. 2 ऑगस्ट 1942 रोजी नेहरू मुंबईला निघाले. त्यांनी टंडनना बोलावले व एक पत्र असलेला लिफाफा दिला. ‘‘मी मुंबईला निघालो आहे. आम्हाला अटक होण्याची शक्यता आहे. तुझ्या टेलिफोनच्या बिलाची अडचण होऊ नये म्हणून ही व्यवस्था.’’ नेहरू म्हणाले.
त्यात दोन महिन्यांच्या टेलिफोन बिलाची बेगमी होती. 44 रुपये नेहरूंनी ठेवले होते व जोडीला एक पत्र. पुढील बिले खालील व्यक्तींकडून घ्यावीत. 1. विजयालक्ष्मी पंडित, 2. इंदिरा नेहरू गांधी, 3. बी. एन. वर्मा. नेहरूंनी ती सोय केली. ‘नॅशनल हेराल्ड’तर्फे नाही. स्वखर्चाने केली.
आपल्या वार्ताहराच्या टेलिफोनची काळजी घेणारे नेहरू, संपादकाच्या स्वातंत्र्याचे स्तोत्र मालक असताना म्हणणारे नेहरू. नेहरू अनेकांना का आवडतात याचे रहस्य यामुळे तरी स्पष्ट व्हावे.
डॉ. स्वामींची लढाई
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी तक्रार दाखल केली. प्रकरण न्यायालयात गेलं. अरुण जेटली अर्थमंत्री असताना चौकशी झाली. या प्रकरणात दम नाही असे त्यांचे मत होते व संपूर्ण प्रकरण बंद केले. हे सर्व प्रकरण नक्की काय आहे हे समजून घेतले पाहिजे. 1 एप्रिल 2008 रोजी हे वृत्तपत्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी वृत्तपत्राची मालकी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडकडे होती. एजीएल कंपनीवर 90 कोटींपेक्षा जास्त कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठी आणखी एका कंपनीची स्थापना करण्यात आली. त्या कंपनीचे नाव यंग इंडिया लिमिटेड. यामध्ये राहुल व सोनिया यांची भागीदारी 38-38 टक्के होती. ‘एजीएल’चे नऊ कोटी शेअर्स 10 रुपये भावाने यंग इंडियाला देण्यात आलेत. 1938 साली शेअर्सचा भाव 10 रुपये होता. त्या किमतीत हे शेअर्स विकले. डॉ. स्वामी यांनी असा आरोप केला की, कोणताही व्यवसाय नाही अशी कंपनी 50 लाखांच्या बदल्यात 2 हजार कोटींची मालक बनली. या कंपनीचे इतर संचालक मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा यांनाही आरोपी केले, पण मुख्य झोत सोनिया व राहुलवरच राहिला. या संपूर्ण प्रकरणात मनी लॉण्डरिंग कोठेच झाले नाही. गुन्हेगारी व्यवहाराला पैसा वापरला असे दिसत नाही. तरीही ‘ईडी’ने येथे प्रवेश केला.
‘सामना’चा आदर्श
‘नॅशनल हेराल्ड’संबंधात माझी राहुल गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांशी काही प्रसंगाने चर्चा झाली. मुंबईत ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्र सुरू आहे. सुजाता आनंदन त्याच्या संपादिका आहेत, पण ‘हेराल्ड’ सुरू आहे हे महाराष्ट्रातील काँग्रेस जनांना तरी माहीत आहे काय? ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र आहे. ते कशाप्रकारे चालवले जाते? व हे वृत्तपत्र लोकप्रिय का? याची माहिती मी ‘नॅशनल हेराल्ड’ चालवू पाहणाऱ्यांना दिली. ‘सामना’ बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केला. तसे ‘नॅशनल हेराल्ड’ पंडित नेहरूंनी सुरू केले. ती फक्त संपत्ती नाही. विचारांचे व भूमिकांचे ते वाहक आहेत. ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात कर्ज फेडण्यासाठी व्यवहार झाला. त्यास गैरव्यवहार म्हणता येणार नाही. या सर्व प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. काय सांगावे, ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात एखादे समन्स नेहरूंच्या नावाने त्यांच्या स्मारकावरही चिकटवले जाईल. गांधी, नेहरू, पटेल यांच्या स्वातंत्र्यसंग्रामास आर्थिक बळ दिले म्हणून बिर्ला व बजाज यांच्या नावानेही समन्स काढले जाईल.
‘नॅशनल हेराल्ड’चे प्रकरण इतके ताणायची गरज नव्हती.
पंडित नेहरूंची ही संस्था टिकावी म्हणून काँग्रेसने काही उलाढाली केल्या असतील. अशा उलाढाली संघ परिवारातील अनेक संस्था करतात. पीएम केअर फंडापासून भाजपच्या खजिन्यात जमा होणाऱ्या शेकडो कोटींच्या रकमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेच आहे.
…पण नेहरूंचा ‘हेराल्ड’ गुन्हेगार ठरला!
पंडित नेहरूंना ई.डी., सीबीआयची नोटीस पोहोचल्यावरच काही जणांचा आत्मा शांत होईल!
@rautsanjay61