12 मजले, 300 रुम, तीन ऑडिटोरियम अन् 150 कोटींचा खर्च; दिल्लीत उभारण्यात आलं संघाचं नवं मुख्यालय

राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवीन मुख्यालय उभारण्यात आले आहे. झंडेवालान भागात जवळपास 4 एकरात ‘केशव कुंज’ नावाचे हे मुख्यालय उभारण्यात आले असून यासाठी 150 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. 12 मजल्यांच्या तीन इमारतींमध्ये हे मुख्यालय असून यात जवळपास 300 रुम, ग्रंथालय, ऑडिटोरियन आणि रुग्णालयही आहे.

आरएसएसच्या नवीन मुख्यालयाचे बांधकाम गेल्या 8 वर्षापासून सुरू होते. नोव्हेंबर 2016 मध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी याचे भूमिपूजन केले होते. 12 मजल्यांच्या साधना, प्रेरणा आणि अर्चना नावाच्या तीन इमारतींमध्ये हे मुख्यालय आहे. या इमारतींमध्ये एकूण 13 लिफ्ट आहेत. 75 हजार लोकांच्या योगदानातून हे मुख्यालय उभे राहिले आहे.

आरएसएसच्या नवीन मुख्यालयात मोठे वाचनालय आहे. तसेच पाच खाटांचे रुग्णालयही आहे. यासह 1300 लोक एकाचवेळी बसू शकेल एवढे मोठे ऑडिटोरियम, लॉन, हनुमान मंदिरही यात आहे. तसेच 270 हून अधिक कार एकाचवेळी पार्क होऊ शकतील एवढे मोठे पार्किंगही आहे.

तीन इमारतींमधील मधली इमारत ही राजस्थानी शैलीने बनवण्यात आली आहे. याच इमारतीच्या अकराव्या मजल्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांचे निवासस्थान आहे. यासह संघाच्या अन्य अधिकाऱ्यांच्या विसाव्यासाठीही यात रुम बनवण्यात आल्या आहेत.

तसेच येथे मोठे मैदानातही आहे, तिथे संघाचे संस्थापक हेडगेवार यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. याच मैदानावर दररोज संघाची शाखा भरणार आहे. या इमारतीच्या चारही बाजुला सुरक्षा चौक्याही उभारण्यात आलेल्या आहेत. मूळच्या गुजरातच्या असलेला आर्किटेक अनुप दवे यांनी आरएसएसच्या मुख्यालयाचे डिझाईन बनवले आहे.