
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे. ‘जनरल एसव्हीआर’ या टेलिग्राम चॅनेलने याबाबतची माहिती दिली असून एका सुरक्षा कर्मचाऱयाला पुतिन हे त्यांच्या बेडरूममध्ये बेशुद्धावस्थेत सापडल्याचे म्हटले आहे. ही घटना रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. कार्डियाक अॅरेस्ट आल्यानंतर पुतिन यांना तातडीने त्यांच्या निवासस्थानातील विशेष वैद्यकीय सुविधा असलेल्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आल्याचे टेलिग्राम चॅनेलने म्हटले आहे. दरम्यान, हे चॅनेल रशियाचे माजी लेफ्टनंट जनरल यांच्याद्वारे चालवले जाते. यापूर्वीही या चॅनेलने पुतिन आजारी असल्याचे वृत्त दिले होते.
नेमके काय घडले…
पुतिन यांना 22 ऑक्टोबर रोजी मॉस्को येथील त्यांच्या खासगी अपार्टमेंटमध्ये हृदयविकाराचा झटका आला. बेडरूममध्ये ते बेशुद्धावस्थेत पडल्याचे आढळून आले. या आवाजामुळे सुरक्षा रक्षकांनी बेडरूममध्ये धाव घेतली. जमिनीवर कोसळण्यापूर्वी पुतिन यांनी टेबलावरील काही वस्तूही खाली पाडल्याचे टेलिग्राम चॅनेल जनरल एसव्हीआरने म्हटले आहे. सुरक्षा रक्षकांनी तातडीने डय़ुटीवर तैनात असलेल्या डॉक्टरांना बोलावले आणि तत्काल पुढील उपचारास सुरुवात झाली.
व्रेमलीनकडून वृत्ताचे खंडन
टेलिग्राम चॅनेलने व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त व्रेमलीनचे प्रवत्ते दमित्री पेसकोव यांनी फेटाळले आहे. सततच्या अफवांवर पेसकोव यांनी हसत उत्तर दिले. पुतिन यांची प्रकृती ठीक असून हृदयविकाराचे वृत्त खोटे आहे. अफवांवर माध्यमे सातत्याने चर्चा करत असतात, असे त्यांनी म्हटले आहे.



























































