
>>ऋतुजा फडके
अविमारक हे नाटक भासाचा कल्पनाविस्तार आहे. या नाटकात सौवीरराज याचा पुत्र ‘अविमारक’ आणि नगाधीश्वर कुन्तिभोजाची कन्या यांचा प्रणय वर्णिलेला आहे. प्रेमविषयक नाटक असल्यामुळे नाटकाचा स्थायी रस ‘शृंगार’ आहे. प्रेम, विरह यांच्या गुंफणीतून विवाह हा नाटकाचा विषय असल्यामुळे नाटकावर ‘करुण’ रसाचीसुद्धा छाया आहे.
संस्कृत-वाङ्मयाच्या इतिहासात भासाचं महत्त्व इतकं आहे की, संस्कृतमधल्या सगळ्या महान नाटककारांनी त्याची महती त्यांच्या त्यांच्या शब्दात विशद केली आहे आणि कुणीही प्रसिद्ध संस्कृत नाटककार भासाची महती विशद केल्याशिवाय आपलं कार्य पूर्ण झालं असं मानत नाही. भासाची साहित्य संपदासुद्धा इतकी विस्तृत आणि विशाल आहे की, त्याने केलेली प्रत्येक साहित्यकृती वेगवेगळी छटा दर्शवते. भासचं प्रत्येक नाटक हे आधीच्या नाटकापेक्षा वेगळं आहे, पण रंजक आहे. म्हणूनच या पुढच्या काही लेखांमध्ये सुद्धा आपण भासाचीच नाटकं पाहणार आहोत आणि त्याबद्दल चर्चा करणार आहोत. आज आपण जे नाटक निवडलेलं आहे ते आहे भासकृत ‘अविमारक.’
अविमारक हे नाटक सहा अंकांमध्ये विभागलेलं आहे. त्यामुळे भरतमुनींनी सांगितलेल्या दहा रूपकांपैकी प्रकरण या प्रकारात मोडतं. या नाटकाचा नायक विष्णुसेन आहे, जो ‘अवि’ नावाच्या असुराचा वध केल्यामुळे ‘अविमारक’ या नावाने प्रसिद्ध झाला. विष्णुसेन सौवीरराजचा पुत्र आहे आणि त्याची माता ‘सुदर्शना’ ही आहे. चंडाभार्गव नावाच्या अत्यंत क्रोधी अशा ऋषींच्या शापामुळे एका वर्षासाठी चांडालत्व प्राप्त झालं आहे आणि हा शापकाळ ते अज्ञातवासात व्यतित करत आहेत.
अविमारक हे नाटक भासाचा कल्पनाविस्तार आहे. या नाटकात सौवीरराज याचा पुत्र ‘अविमारक’ आणि नगाधीश्वर कुन्तिभोजाची कन्या यांचा प्रणय वर्णिलेला आहे. हा प्रणय हस्तीसंभ्रम रागाच्या पूर्वदिनापासून सुरू होतो आणि संपूर्ण नाटकात प्रगाढ रूपात परिणत होतो. लपत छपत सुरू झालेल्या प्रेमाच्या कथानकाचा शेवट दोघांच्या परिणयाने होतो. अर्थातच प्रेमविषयक नाटक असल्यामुळे नाटकाचा स्थायी रस ‘शृंगार’ आहे. प्रेम, विरह यांच्या गुंफणीतून विवाह हा नाटकाचा विषय असल्यामुळे नाटकावर ‘करुण’ रसाचीसुद्धा छाया आहे.
भास त्याच्या कथानकासाठी प्रसिद्ध आहे. भास त्याच्या छोटय़ा छोटय़ा वाक्यांमधून सरळ शब्दांच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग आणि वाचक वर्ग दोघांनाही खिळवून ठेवतो. त्याच्या कथानक प्रस्तुत करण्यात इतकी सहजता आहे की, वाचतो आहे किंवा बघतो आहे ते खरोखरीच आपल्या आजूबाजूला घडतं आहे, याचा आपल्याला भास होतो. ‘अविमारक’ या नाटकात काव्य-कौशल्याचासुद्धा अगदी चपखल वापर भासाने केलेला दिसतो. माणसाची सूक्ष्मातीसूक्ष्म मनोवृत्ती, प्रकृतीचे सूक्ष्म दर्शन त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम भासाने या नाटकात व्यक्त केला आहे.
पूर्वा तु काष्ठा तिमिरानुलिप्ता सन्ध्यारुणा
भाति च पश्चिमाशा ।
द्विधा विभक्तान्तरमन्तरिक्षं
यस्यार्धनारीश्वरूपशोभाम् 2/12।।
संध्याकाळ झालेली आहे. पूर्वेला अंधार दाटून आला आहे आणि पश्चिमेला संधिप्रकाश पडला आहे. अंतरिक्षाचे दोन भाग पडले आहेत. जणू भगवान शंकर अर्धनारीश्वाराच्या रूपात प्रकट झाले आहेत.
उरः स्तनतटालसं जघनभारबिना तनुः
मुखं नयनवल्लभं प्रकृतिताम्रविम्बाधरम् ।
भये?पि यदि तादृशं नयनपात्रपेयं वपुः
कथं तु सुरतान्तरप्रचुरविभ्रमं तद् भवेत् ? 2/6।।
या श्लोकात अविमाराकाला पहिल्याच नजरेत ‘कुरंगी’ची काया, मुख कसं भावतं याचं यथार्थ वर्णन केलेलं आहे.
या अशा अनेक सोप्या, पण मनाला भावणाऱया रचनांनी हे नाटक सजलेलं आहे. जे वाचकालासुद्धा आनंद दिल्याशिवाय राहात नाही आणि म्हणूनच भासाचं ‘अविमारक’ हे नाटक संस्कृत साहित्यात एक महत्त्वाचं पान मानलं जातं.






























































