सामना अग्रलेख – होय, बाळासाहेब असते तर…

ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची प्रखर देशभक्त आणि हिंदुत्ववादी शिवसेना फोडली, एकनाथ शिंदे व त्यांच्या हस्तकांना धमक्या व पैशांच्या बळावर विकत घेतले ते आता बाळासाहेबांचे नाव घेतात हा महाराष्ट्रद्रोह आहे. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे गृहमंत्री अमित शहांकडे नाहीत. स्वाभिमानी महाराष्ट्रात त्यांनी गुलामांची पैदास सुरू केली. गुलामांच्या गराड्यात महाराष्ट्रास अडकवून शहा बाळासाहेबांची आठवण काढतात. शहांना चांगल्या उपचारांची गरज आहे. बाळासाहेब असते तर जीवनभर आठवण राहील असे कडक उपचार त्यांच्यावर झाले असते!

अमित शहा हे देशाला लाभलेले सगळ्यात फुसके गृहमंत्री आहेत. त्यांच्या काळात भारतात सुरक्षा, कायदा-सुव्यवस्थेचा जास्त विचका झाला आहे. गुजरातमध्ये मोदींचे हस्तक म्हणून ते काम करीत होते. त्यामुळे मोदी यांचे दिल्लीत आगमन झाल्यावर शहा यांना तीच भूमिका राष्ट्रीय स्तरावर साकार करण्याची संधी मिळाली. अमित शहा हे आव तर मोठा आणतात व भाषणेही तावातावाने करतात. मात्र तो सगळा ‘आव’ आणि ‘ताव’ पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामुळे फुसका ठरला. पाकडे दहशतवादी अचानक आले व त्यांनी 26 हिंदू महिलांच्या कपाळावरचे कुंकू पुसून पलायन केले, ते आजतागायत सापडलेले नाहीत. हे दहशतवादी कोठे गेले हे आता अमित शहांनाही माहीत नाही. 26 महिलांचे कुंकू पुसणारे अतिरेकी पाकिस्तानात गेले? हवेत विरले? जमिनीत गडप झाले की भाजपमध्ये गेले? याचा खुलासा शहा करीत नाहीत व तेच शहा महाराष्ट्रात येऊन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेऊन उठाठेव करीत आहेत. शहा महाराष्ट्रात येऊन म्हणाले, ‘‘आज बाळासाहेब असते तर त्यांनी पंतप्रधान मोदींना गळ्याशी लावले असते.’’ शहा यांचा हा भ्रम आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांनी सगळ्यात आधी 26 महिलांच्या कपाळावरील सिंदूर पुसल्याचा ठपका ठेवून अपयशी गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा मागितला असता. पंतप्रधान मोदींना थेट फोन लावून त्यांनी खणखणीतपणे बजावले असते, ‘‘मोदीजी, 26 महिलांचे कुंकू पुसले ही

गृहखात्याची निष्क्रियता आणि बेफिकिरी

आहे. अशा अपयशी गृहमंत्र्याला लगेच हाकलून द्या.’’ गृहमंत्र्यांना गेट आऊट करण्यासाठी बाळासाहेबांनी रान उठवले असते. बाळासाहेबांनी जाहीरपणे प्रश्न विचारला असता, ‘‘26 हिंदूंची हत्या करणारे अतिरेकी अद्यापि मोकाट का आहेत? ते अद्यापि पकडले जात नाहीत याला जबाबदार कोण? गृहमंत्री हा फक्त विरोधकांचे पक्ष फोडण्यासाठी खुर्चीवर बसवला आहे काय?’’ बाळासाहेबांनी या प्रश्नांची सरबत्ती नक्कीच केली असती. 26 हिंदूंच्या हत्यांकडे डोळेझाक करून ‘सिंदूर’ कारवाईचे राजकारण करणाऱया मोदींना बाळासाहेबांनी मिठी मारली असती असे शहांनी सांगणे हा बाळासाहेबांचा अपमान आहे. कश्मीरचे हत्याकांड व ‘ऑपरेशन सिंदूर’वर देशाच्या मनात काही प्रश्न आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा ही विरोधी पक्षांची मागणी मोदी-शहांनी फेटाळली. कारण प्रश्नांना सामोरे जायची हिंमत त्यांच्यात नाही आणि पंतप्रधान मोदी हे गुजरातच्या दाहोदमध्ये जाहीर सभा व यात्रा काढून राजकारण करीत आहेत. मोदी अद्यापि पहलगामला गेलेले नाहीत. पूंछ येथे पाकड्यांच्या गोळीबारात 17 भारतीय नागरिक ठार झाले. तिकडे मोदी फिरकलेले नाहीत. मोदी मणिपूरलाही गेले नाहीत, पण मोदी सरकारी खर्चाने ‘सिंदूर यात्रा’ काढून त्यात स्वतःला ‘योद्धा’ असल्याचे भासवीत आहेत. पुन्हा ज्यांना ‘मंगळसूत्र चोर’ वगैरे म्हणून निवडणूक प्रचारात हिणवले, त्या

मुसलमान समाजाला

यात्रेत सहभागी होण्याचे खास आमंत्रण दिले जात आहे. युद्धकाळात प्रसिद्धी पावलेल्या कर्नल सोफिया कुरेशींच्या गुजरातमधील नातेवाईकांना जिल्हाधिकारी कार्यालयातून फोन गेले व मोदींच्या ‘सिंदूर’ उत्सवात हजर राहण्याचे फर्मान दिले हे एक ढोंगच म्हणावे लागेल. अशा माणसाची हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे गळाभेट घेतील हे शक्य नाही. अमित शहांना हिंदुहृदयसम्राट समजलेच नाहीत. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची प्रखर देशभक्त आणि हिंदुत्ववादी शिवसेना फोडली, एकनाथ शिंदे व त्यांच्या हस्तकांना धमक्या व पैशांच्या बळावर विकत घेतले ते आता बाळासाहेबांचे नाव घेतात हा महाराष्ट्रद्रोह आहे. काँगेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतील सर्व भ्रष्ट आणि घोटाळेबाज लोक आज अमित शहा, मोदींचे विशेष चमचे झाले आहेत. मोदींना काँग्रेसमुक्त व भ्रष्टाचारमुक्त भारत करायचा होता, पण मोदी यांनी भाजपची काँग्रेस केली व काँग्रेस-राष्ट्रवादीतील भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये आणून पवित्र केले. बहुधा पहलगामचे दहशतवादीही भाजपमध्ये जाऊन पावन झाले असावेत आणि त्यामुळेच ते सापडत नाहीत काय? असा प्रश्न तमाम जनतेला त्यामुळेच पडला आहे. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे गृहमंत्री अमित शहांकडे नाहीत. स्वाभिमानी महाराष्ट्रात त्यांनी गुलामांची पैदास सुरू केली. गुलामांच्या गराड्यात महाराष्ट्रास अडकवून शहा बाळासाहेबांची आठवण काढतात. शहांना चांगल्या उपचारांची गरज आहे. बाळासाहेब असते तर जीवनभर आठवण राहील असे कडक उपचार त्यांच्यावर झाले असते!