
‘चिनी विषाणू’ म्हटल्या गेलेल्या कोरोनाने संपूर्ण जगाला आजारपण आणि आर्थिक अरिष्टाच्या खड्डय़ात ढकलले खरे, पण खुद्द चीनची अवस्था तरी वेगळी कुठे आहे? चीनदेखील कोरोनाच्या ‘खड्डय़ा’तच अडकलेला आहे. त्या देशाच्या मानगुटीवर बसलेले कोरोनाचे भूत उतरायला तयार नाही. अधूनमधून ते डोके वर काढतच आहे. ‘स्टील्थ ओमायक्रोन’च्या साथीमुळे तेथील तीन प्रमुख औद्योगिक शहरांमध्ये लादलेले संपूर्ण लॉक डाऊन त्याचाच पुरावा आहे.
हिंदुस्थानात कोरोनाच्या तिसऱया लाटेचा कहर जवळ जवळ ओसरला आहे. मात्र ज्या चीनमधून कोरोना महामारी संपूर्ण जगात पसरली, त्या चीनमध्ये या रोगाने पुन्हा थैमान घातले आहे. ‘स्टील्थ ओमायक्रोन’ या कोरोनाच्या विषाणूमुळे चीनमधील शेन्झेन, युचेंग आणि जिलिंग प्रांताची राजधानी चांगचून या शहरांमध्ये 100 टक्के लॉक डाऊन करण्यात आले आहे. मागील 24 तासांत चीनमध्ये सापडलेले कोरोना रुग्ण आजपर्यंतच्या काळातील सर्वाधिक आहेत. आपल्याकडे मध्यंतरी ज्या ओमायक्रोन या कोरोना विषाणूच्या उपप्रकाराने तिसरी लाट आणली होती, त्याच ‘बीए-2’ (स्टील्थ ओमायक्रोन) या विषाणूने चीनमध्ये मोठा संसर्ग पसरविला आहे. ‘‘चीन सध्या कठीण काळातून जात आहे’’ असे वर्णन यासंदर्भात तेथील साथरोग तज्ञ झेंग वेनहोंग यांनी केले आहे. त्यावरूनही चीनमधील सध्याच्या कोरोना संकटाची कल्पना येते. फक्त चीनमध्येच नाही, तर शेजारच्या हाँगकाँग आणि दक्षिण कोरियातही याच विषाणूने हातपाय पसरले आहेत. चीनमधील रुग्णसंख्या तीन दिवसांत
नऊपटींनी वाढली
आहे, तर दक्षिण कोरियात बुधवारी चार लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. चीन, हाँगकाँग आणि कोरियामध्ये कोरोनाचा ‘स्थानिक संसर्ग’ सुरू झाला आहे, असाच याचा अर्थ आहे. कोरोना संपला असे ज्यांना वाटत आहे, त्यांच्यासाठी हा धोक्याचा आणि सावधानतेचा इशारा आहे. कारण दोनच दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील कोरोनाचा जीवघेणा डेल्टा आणि वेगवान संसर्ग होणारा ओमायक्रोन यांच्यापासून एक नवीन ‘संयुक्त विषाणू’ निर्माण झाल्याचा इशारा दिला होता. या विषाणूत दोन्ही व्हेरिएंटचे ‘दुर्गुण’ असल्याने जगाला त्याचा मोठा तडाखा बसू शकतो, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते. फ्रान्समधील अनेक भागांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे. नेदरलॅण्ड, डेन्मार्कमध्येही असे काही नवीन विषाणू सापडले आहेत. त्यात आता चीनसह हाँगकाँग, द. कोरियामध्ये ‘स्टील्थ ओमायक्रोन’ने धुमाकूळ घातला आहे. आपल्या देशात तिसऱया लाटेचाही तडाखा मोठाच होता, पण लसीकरणामुळे ती
जीवघेणी ठरली
नव्हती. मात्र जगातील अनेक देशांमध्ये अजूनही लसीकरणाचा वेग कमीच आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणि प्रसार सुरूच आहे. चीनसारख्या कोरोनाचा ‘निर्माता’ म्हटल्या जाणाऱया देशातही कोरोना संपलेला नाही, हे अधिक महत्त्वाचे आहे. पुन्हा चीनमधील सध्याच्या कोरोना लाटेमुळे तेथील व्यापारउदीम ठप्प पडण्याची भीती आहे. चीन आणि हाँगकाँगचा शेअर बाजार गुरुवारी सलग दुसऱया दिवशी कोसळला. शिवाय चीनमधील ज्या शहरांत सध्या पूर्ण लॉक डाऊन आहे ती औद्योगिक शहरे आहेत. तीच पूर्ण बंद झाल्याने त्याचा परिणाम जसा तेथील अर्थव्यवस्थेवर होईल तसा त्यावर अवलंबून असलेल्या इतर देशांच्या अर्थकारणावरही होऊ शकतो. ‘चिनी विषाणू’ म्हटल्या गेलेल्या कोरोनाने संपूर्ण जगाला आजारपण आणि आर्थिक अरिष्टाच्या खड्डय़ात ढकलले खरे, पण खुद्द चीनची अवस्था तरी वेगळी कुठे आहे? चीनदेखील कोरोनाच्या ‘खड्डय़ा’तच अडकलेला आहे. त्या देशाच्या मानगुटीवर बसलेले कोरोनाचे भूत उतरायला तयार नाही. अधूनमधून ते डोके वर काढतच आहे. ‘स्टील्थ ओमायक्रोन’च्या साथीमुळे तेथील तीन प्रमुख औद्योगिक शहरांमध्ये लादलेले संपूर्ण लॉक डाऊन त्याचाच पुरावा आहे.






























































