सामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या!

5164

`लॉक डाऊन’मुळे कोळी बांधवांच्या मच्छिमार नौका बंदरांवर जशा हेलकावे खात आहेत तशा महाराष्ट्रात लाखोंच्या जीवन नौका कोरोनामुळे गटांगळ्या खाताना दिसत आहेत. सरकारच्या तिजोरीत आधीच खडखडाट होता. त्यात हे संकट. या संकटावर मात करावीच लागेल.

हिंदुस्थानात जे घडू नये ते घडताना दिसत आहे. इतका हाहाकार आपल्या देशात कधीच झाला नव्हता. आम्ही संकटे काय कमी झेलली? संकटांच्या छाताडावर पाय रोवून हा देश मजबुतीने उभा आहे. दुष्काळ पाहिले, महापुराच्या लाटा झेलल्या, वादळे अनुभवली, दंगली, बॉम्बस्फोट, साथीची रोगराईही पाहिली, पण या कोरोनाचे लक्षणच वेगळे आहे. ब्रिटनचे राजपुत्र चार्ल्स यांनाही कोरोनाची लागण झाली आहे व ते आता `क्वारंटाइन’ झाले आहेत. म्हणजे राजा ते रंक या कोरोनाने कुणालाही सोडलेले नाही. कोरोनामुळे कोणाचे कसे नुकसान होत आहे याचे हिशोब मांडले जात आहेत. सर्व व्यवसाय ठप्प आहेत. समुद्रात मच्छिमारांच्या बोटी गेल्या त्या `लॉक डाऊन’च्या आधी. मासेमारी करून त्या बंदरावर परतल्या, पण तोपर्यंत संपूर्ण `लॉक डाऊन’ झाले होते. आता त्या शेकडो बोटी कोट्यवधींची मासेमारी करून बंदरावर उभ्या आहेत. माशांची विक्री करता येत नाही. लहान बोटींवरही प्रत्येकी चार-पाच लाखांचे मासे आहेत. या मच्छिमारांवर अनेकांची घरे चालतात. मात्र `लॉक डाऊन’ झाल्याने या सर्व कोळी बांधवांची अवस्था बिकट झाली आहे. कारण हा सर्व माल आता बोटीवर सडून जाण्याची भीती आहे. महाराष्ट्र सरकारने कोळी बांधवांच्या या समस्येवर मार्ग काढायला हवा. हा विषय फक्त एकाच समाजाचा नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठे पॅकेज जाहीर करून लोकांना दिलासा दिला आहे. त्यात समाजातील बरेच घटक सामील आहेत. 1.70 लाख कोटींचे हे पॅकेज असून त्यात वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपासून मनरेगा मजुरांपर्यंत सगळ्यांची काळजी घेतली आहे. वृद्ध, दिव्यांग, महिलांना महिन्याला आर्थिक लाभ मिळणार आहे. पण त्यात

मच्छिमार कोळी

बांधवांना काही मिळाल्याचे दिसत नाही. त्यांच्या जीवनाच्या नौका `लॉक डाऊन’च्या सागरात हेलकावेच खात आहेत. सर्व काही बंद आहे. लहान-मोठे उद्योग बंद केल्याने मजूरवर्ग आपल्या पोराबाळांचे ओझे खांद्यावर घेऊन पायपीट करत गावी जाताना दिसत आहे. सार्वजनिक वाहतूक बंद केल्याने दिल्लीचा मजूरवर्ग झारखंड, छत्तीसगड, बिहार, लखनौपर्यंत उपाशीतापाशी चालत निघाला आहे. दोन दिवस त्यांच्या पोटात अन्नपाणी नाही. पुण्याहूनही मोलमजुरी करणारी काही मंडळी आपल्या कच्च्याबच्यांसह अशीच उन्हातान्हात तब्बल 250 किलोमीटर पायपीट करीत कशीबशी सोलापूरपर्यंत आली. अखेर तेथे काही पोलीस कर्मचारी आणि समाजसेवी मंडळींनी त्यांची त्यांच्या कर्नाटकातील मूळ गावी जाण्याची व्यवस्था केली. राज्यात अनेक ठिकाणी हेच चित्र दिसत आहे. मुंबईजवळच्या बोईसर एमआयडीसीतूनही शेकडो मजूर `लॉक डाऊन’मुळे पायी चालत आपापल्या गावी निघाले आहेत. ही छायाचित्रे ज्याचे मन विचलित करीत नाही तो मनुष्य नव्हे. या सर्व मजूरवर्गाने आपापल्या राज्यात जाऊन खायचे काय हा प्रश्नच आहे. त्यांना पुढील दोन-चार महिने `रेशनिंग’ मिळेल हे खरे, पण आर्थिक मंदीचा फेरा यापुढे बराच काळ राहील. महाराष्ट्रातातच किमान 40 ते 50 लाख लोकांना त्यांचा नियमित रोजगार गमवावा लागेल असे भयंकर चित्र आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, पण आता शेतात उत्पादन नाही. उत्पादन झाले तरी मालास भाव नाही. त्यामुळे त्याला नव्या चिंतेने घेरले आहे. मध्यमवर्गीयांच्या बँकांचे हफ्ते, गृहकर्जाचे हफ्ते कसे फेडायचे हादेखील प्रश्न आहेच. आता रिझर्व्ह बँकेने रेपोदर आणि रिव्हर्स रेपोदर यात कपात केली आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर प्रकारच्या कर्जांचे हफ्ते भरणाऱ्या कोट्यवधी लोकांना दिलासा मिळू शकेल. विविध कर्जांच्या ईएमआयची वसुली तीन महिने स्थगित करावी असाही सल्ला रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांना दिला आहे. म्हणजे ईएमआयबाबतचा निर्णय रिझर्व्ह बँकेने संबंधित बँकांवर सोडला आहे. खरे म्हणजे रिझर्व्ह बँकेनेच तसे थेट आदेश दिले असते तर अधिक बरेच झाले असते. कारण `लॉक डाऊन’मुळे मध्यमवर्गीयांच्याही उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. तेव्हा या मोठया समाजघटकालाही दिलासा देणारे एखादे पॅकेज द्यायला हवे. नाहीतर संपूर्ण मध्यमवर्ग मोठ्या संकटाच्या खाईत ढकलला जाईल. नोटाबंदीनंतरचे

`साईड इफेक्टस्’

जसे भयंकर होते त्यापेक्षा कोरोनानंतरचे `साईड इफेक्टस्’ खतरनाक दिसतात. प्रत्येक राज्य आपल्या परीने आपापल्या प्रजेची काळजी घेत आहे. राज्यांनी आपली स्वतंत्र पॅकेजेस जाहीर केलीच आहेत. कोणी वीज बिल माफ केले, कोणी विद्यार्थ्यांची फी माफ केली. केंद्राने काही हातभार लावला आहे. पण मुख्य प्रश्न आहे तो जीवनरक्षणाचा व पुढचा प्रश्न असेल तो `लॉक डाऊन’नंतरच्या जीवन-मरणाचा. `लॉक डाऊन’मुळे कोळी बांधवांच्या मच्छिमार नौका बंदरांवर जशा हेलकावे खात आहेत तशा महाराष्ट्रात लाखोंच्या जीवन नौका कोरोनामुळे गटांगळ्या खाताना दिसत आहेत. सरकारच्या तिजोरीत आधीच खडखडाट होता. त्यात हे संकट. या संकटावर मात करावीच लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या