सामना अग्रलेख – कोंबड्यांचे हत्याकांड!

नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत असतानाच बर्ड फ्लूचे नवे संकट शेतकऱयांवर कोसळले आहे. शेतकरी सर्वच पातळ्यांवर अडचणीत आहेत. आभाळच फाटल्यावर ठिगळ तरी कुठे कुठे लावायचे हाच प्रश्न आहे. ‘बर्ड फ्लू’मुळे फक्त पक्षी व कोंबडय़ाच मरत नाहीत, तर ग्रामीण भागातला कुक्कुटपालन करणारा शेतकरी, त्यांचे कुटुंबही मरत आहे याचे भान केंद्रातल्या व ज्या राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा फैलाव होत आहे तेथील राज्यकर्त्यांना आहे काय? संकटे रांगेत उभीच आहेत. विरोधकांनीही कोंबड्यांच्या रक्षणावर बोलावे. स्वतःच्या सुरक्षेवर नंतर बोलावे. कोंबड्यांचे ‘हत्याकांड’ धक्कादायक आहे.

कोरोना काळात माणसांना प्राण गमवावे लागले. आता राज्यांवर आणि देशावरही ‘बर्ड फ्लू’चे सावट आल्याने पक्षी, कोंबडय़ा मरू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकरी, कुक्कुटपालन करणारे पोल्ट्री फार्मवाले व्यापारी मोठय़ाच संकटात सापडले आहेत. चिकनविक्रीत 40 टक्के घसरण झाली. त्याचा आर्थिक फटका समाजातील मोठय़ा वर्गाला बसला आहे. कोरोना लसीचा उत्सव सुरू असतानाच हे नवे संकट फडफडू लागले. या बर्ड फ्लू संकटात कोंबडय़ा, पक्षी मरत आहेत म्हणून माणसांना आनंद होऊ नये. कोंबडय़ा, पक्षी पर्यावरण, निसर्ग मानवी जीवनाचे भाग आहेत. निसर्गाचा समतोल बिघडविणारा हा प्रकार आहे. आधीच पावसाने तेरावा, चौदावा महिना सुरू केल्याने द्राक्ष, काजू व इतर फळांचे उत्पादन संकटात आले. त्यात बर्ड फ्लूने कोंबडय़ांची शेतीही मारली. महाराष्ट्रात लातूर, बीड, नगर अशा भागात कोंबडय़ा, पक्षी मरू लागले, पण देशात केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश अशा राज्यांत बर्ड फ्लूचा फैलाव वाढल्याचे केंद्र सरकारने जाहीर केल्याने चिंता वाढली आहे. बीड जिह्यातील पाटोदा तालुक्यात रविवारी
26 कावळे मरून पडले. लातूरला कोंबडय़ा मेल्या. वरील सात राज्यांत इतर अनेक जातीचे पक्षी मरून पडल्याचे आढळून आले. जेथे माणसांचा आक्रोश ऐकायला कोणी तयार नाही तेथे या पक्षी, कोंबडय़ांची वेदना कोण समजून घेणार? आता दिल्लीतूनही धक्कादायक बातमी आली आहे. लाल किल्ला तसेच दिल्लीतील इतर पार्कांतही कावळे आणि कबुतरे मोठय़ा प्रमाणात मरून पडत आहेत.

दिल्लीतल्या पार्कांत

रविवारी शंभरच्या वर कावळे आणि पन्नास बदके मरण पावल्याचे समोर आले. कोंबडय़ांना फ्लूच्या आजाराने ग्रासल्याने दिल्ली परिसरातील अनेक कोंबडी बाजार 10 दिवसांसाठी बंद ठेवले आहेत. कोंबडय़ा, अंडी यांची विक्री करणाऱया लहान-मोठय़ा व्यापाऱयांवर त्यामुळे संकट कोसळले आहे. भीतीमुळे लोक काही काळ कोंबडय़ा व अंडी खाणे टाळतील व त्यातून या क्षेत्राचे आर्थिक व्यवस्थापन बिघडेल. नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत असतानाच बर्ड फ्लूचे नवे संकट शेतकऱयांवर कोसळले आहे. शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तानी, खलिस्तानी, चिनी, नक्षलवादी, माओवादी यांचा हात असल्याचे सरकारी मंडळींचे म्हणणे आहे. त्यामुळे आता ज्या कोंबडय़ा, पक्षी मरून पडत आहेत त्या त्यांच्या रहस्यमय हत्याकांडातही खलिस्तानी, पाकिस्तानी, नक्षलवाद्यांचाच हात आहे असे भाजप प्रवक्त्यांनी जाहीर केले नाही म्हणजे मिळवले. शेतकरी सर्वच पातळय़ांवर अडचणीत आहेत. आभाळच फाटल्यावर ठिगळ तरी कुठे कुठे लावायचे हाच प्रश्न आहे. अंडय़ांचा व्यापार जसा घाऊक असतो तसा किरकोळीतही असतो. रस्त्यावर पाच-दहा अंडी दिवसभरात विकून चूल पेटविणारेही आहेत. घरीच पाळलेल्या कोंबडय़ा व अंडी विकणाऱयांची संख्या ग्रामीण भागात मोठी आहे. त्यांचे एक स्वतःचे अर्थशास्त्र आहे व गरीब अंडी विक्रेत्यांच्या अर्थव्यवस्थेस नव्या कृषी कायद्यात स्थान नाही. नव्या कृषी कायद्यानुसार ‘बर्ड फ्लू’चा मारा झालेल्या कोंबडय़ा आणि अंडय़ांना तुमचे ते

कॉर्पोरेट अडते

हातही लावणार नाहीत. मग कोंबडय़ा, अंडय़ांची शेती म्हणजे पोल्ट्री फार्मिंग करणाऱया शेतकऱयांना आधार कोणी द्यायचा? ‘बर्ड फ्लू’मुळे फक्त पक्षी व कोंबडय़ाच मरत नाहीत, तर ग्रामीण भागातला कुक्कुटपालन करणारा शेतकरी, त्यांचे कुटुंबही मरत आहे याचे भान केंद्रातल्या व ज्या राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा फैलाव होत आहे तेथील राज्यकर्त्यांना आहे काय? महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहेच व त्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी एक बैठक सोमवारी घेतली. बर्ड फ्लू घुसू नये म्हणून राज्याची सीमाबंदी करण्याचा निर्णय पशुपालन मंत्री केदार यांनी घेतला. महाराष्ट्रात आजाराची लागण झालेल्या 80 हजार कोंबडय़ा मारणार असेही ते म्हणतात. चिकन व अंडी अर्धा तास रटारटा शिजवा. त्यामुळे बर्ड फ्लूची भीती राहणार नाही असे मार्गदर्शन केदार यांनी केले. हा मजकूर लिहीत असताना परभणीत हजारभर कोंबडय़ा मरून पडल्याचे वृत्त आहे. हा संसर्ग वाढतच आहे. म्हणजे पोल्ट्री फार्म्समधील कोंबडय़ांना बाजारात उठाव मिळणार नाही तोपर्यंत कोंबडय़ांच्या पालनाची जबाबदारी त्या मालकाचीच राहील. पुन्हा विशिष्ट मुदतीत कोंबडय़ा बाजारात जाऊन हॉटेलात गेल्या नाहीत तर त्यांचे वजन वाढते. अशा कोंबडय़ा वातड, बेचव म्हणून हॉटेलवाले घेत नाहीत. म्हणजे या लाखो कोंबडय़ा शेतकऱयांच्या अंगावर पडतील व मोठे खड्डे खणून त्यात या लाखो कोंबडय़ांना जिवंतपणी मूठमाती द्यावी लागेल. हे सर्व निर्घृण तितकेच भयंकर आहे. संकटे रांगेत उभीच आहेत. विरोधकांनीही कोंबडय़ांच्या रक्षणावर बोलावे. स्वतःच्या सुरक्षेवर नंतर बोलावे. कोंबडय़ांचे ‘हत्याकांड’ धक्कादायक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या