सामना अग्रलेख – मुर्मू यांचे अभिनंदन… बाणेदार देशसेवा घडो!

अलीकडच्या काळात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदास मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. देशातील अनेक स्वायत्त संस्था सरकारच्या बटीक असल्याप्रमाणे वागत असताना तळागाळातून राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचलेल्या द्रौपदी मुर्मू या सर्वोच्च सिंहासनाची बूज कशी राखतात हे पाहणे कुतूहलाचे असणार आहे. तूर्तास, मुर्मू यांचे अभिनंदन! देश आज कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करत असताना निःपक्ष व बाणेदार राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचा लौकिक व्हावा हीच सदिच्छा!

देशाच्या प्रथम नागरिक तथा पंधराव्या राष्ट्रपती म्हणून अपेक्षेप्रमाणे द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार असलेल्या द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. अर्थात, भाजपच्या पाठीशी असलेले मोठे संख्याबळ आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच विरोधी पक्षांत नसलेली एकवाक्यता यामुळे या निवडणुकीचा निकाल काय असणार हे मतदानापूर्वीच जगजाहीर झाले होते. निवडणुकीची औपचारिकता पूर्ण झाली आणि देशातील सर्वात प्रतिष्ठत पदावर द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या. ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्याच्या कुसुमी तालुक्यातील उपरबेडा या लहानशा खेड्यातून देशातील सर्वात शक्तिशाली वास्तूमध्ये प्रवेश करणाऱया द्रौपदी मुर्मू देशातील पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती बनल्या आहेत. एक आदिवासी महिला प्रथमच देशाच्या राष्ट्रपतीपदावर आरूढ होणार असल्याने एनडीएच काय, पण रालोआच्या सदस्य नसलेल्या पक्षांनीही द्रौपदी मुर्मू यांना आपला पाठिंबा आधीच जाहीर केला होता. शिवसेनेनेदेखील याच मुद्द्यावर द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. झारखंड मुक्ती मोर्चा, बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, तेलगू देसम आणि बहुजन समाज पार्टी या रालोआबाहेरील विरोधी पक्षांनीही द्रौपदी मुर्मू यांना समर्थन जाहीर केल्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या

निवडणुकीचे पारडे

पूर्णपणे द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने झुकले होते. आश्चर्याची गोष्ट अशी की, आंध्र प्रदेशातील एकूण एक म्हणजेच शंभर टक्के मते मुर्मू यांच्या पारड्यात पडली. 64 वर्षीय द्रौपदी मुर्मू 25 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील आणि मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून पदभार स्वीकारतील. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्म झालेल्या आणि आजवरच्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती होण्याचा मान द्रौपदी मुर्मू यांनी मिळवला आहे. ओडिशाच्या संथाल आदिवासी समाजात जन्मलेल्या द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने देशभरातील आदिवासी समुदायाला आनंद होणे स्वाभाविक आहे. उपरबेडा हे खेडेगाव ते राजधानीतील राष्ट्रपती भवन हे सुमारे दोन हजार किलोमीटरचे अंतर पार करणे तसे सोपे नव्हते. प्रारंभी काळात सिंचन विभागात कारकुनाची नोकरी व नंतर शिक्षिका म्हणून काम केल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपच्या शिडीवर ठेवलेले हे पहिले पाऊलच त्यांना आज राष्ट्रपती भवनाच्या शिखरापर्यंत घेऊन गेले. 1997 साली नगरसेवक, 2000 साली आमदार व बिजू जनता दल-भाजप सरकारमध्ये मंत्री, 2015 मध्ये झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती आणि आता थेट राष्ट्रपती, असा हा मुर्मू यांचा साराच प्रवास विस्मयकारक म्हणावा लागेल. संथाली आणि उडिया भाषेतील उत्कृष्ट वक्त्या असलेल्या द्रौपदी मुर्मू यांची प्रजापिता ब्रह्माकुमारींच्या आध्यात्मिक विचारधारेशी जवळीक आहे. 2009 ते 2015 हा सहा वर्षांचा काळ मुर्मू यांच्या

व्यक्तिगत आयुष्यात

वेदनादायी ठरला. दोन मुलांचा लागोपाठ मृत्यू आणि त्यानंतर पतीचे निधन यामुळे काहीशा खचलेल्या मुर्मू यांनी ब्रह्माकुमारींच्या ध्यान पद्धतीचा अवलंब करून या दुःखावर मात केली, असे सांगितले जाते. पतीच्या निधनानंतर त्यांनी आपले घर एका शाळेसाठी दान करून टाकले. इतकेच नव्हे, तर मरणोत्तर नेत्रदानाची घोषणाही त्यांनी सहा वर्षांपूर्वीच केली. अशी सहृदयी व्यक्ती देशाच्या राष्ट्रपतीपदावर आरूढ होत असेल तर या निवडीचे समस्त देशवासीयांनी स्वागतच करायला हवे! हिंदुस्थानचे राष्ट्रपतीपद हे शोभेचे असल्याची टीका नेहमीच होत असली तरी हिंदुस्थानच्या राज्यघटनेचे ‘कस्टोडियन’ अर्थात ‘रक्षणकर्ते’ म्हणून हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. अलीकडच्या काळात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदास मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. राष्ट्रपती म्हणजे कोणीतरी ‘नामधारी’ ही प्रतिमा पुसून देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना घटनात्मक पदाची प्रतिष्ठा वाढवावी लागेल. देशातील अनेक स्वायत्त संस्था सरकारच्या बटीक असल्याप्रमाणे वागत असताना तळागाळातून राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचलेल्या द्रौपदी मुर्मू या सर्वोच्च सिंहासनाची बूज कशी राखतात, हे पाहणे कुतूहलाचे असणार आहे. तूर्तास, मुर्मू यांचे अभिनंदन! देश आज कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करत असताना निःपक्ष व बाणेदार राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचा लौकिक व्हावा हीच सदिच्छा!