सामना अग्रलेख – ऋषितुल्य सरस्वतीपुत्र…आता ब्रह्मांडात शिवचरित्र!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘‘शिवचरित्र ब्रह्मांडापलीकडे नेण्यासाठी मला सव्वाशे वर्षांचे आयुष्य हवे आहे’’, असे साकडे घालणारा आणि हयातभर शिवचरित्राची महापूजा मांडणारा बाबासाहेब पुरंदरे नावाचा शिवसाधक जणू शिवचरित्राच्या पारायणासाठीच आज ब्रह्मांडात लीन झाला. आयुष्यभर शिवचरणाशीच आपली सेवा रुजू करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आता साक्षात स्वर्गलोकी शिवचरित्राचे आख्यान करतील, तेव्हा स्वर्गलोकातील समस्त देवादिक महाराजांवर, या आख्यानावर व शिवशाहिरांवर पुष्पवृष्टी केल्याशिवाय राहणार नाहीत!

छत्रपती शिवाजी महाराज या अकरा अक्षरी मंत्राचा आयुष्यभर जप करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत केवळ आणि केवळ शिवमय जीवन जगणारे शिवरायांचे मावळेच! शिवाजी महाराज हेच त्यांचे एकमेव दैवत होते. तब्बल शंभर वर्षांचे आयुष्यमान लाभलेल्या शिवशाहिरांनी आपले प्रदीर्घ आयुष्य सार्थकी लावले ते शिवरायांच्याच चरणी. तेजःपुंज चेहरा, छातीपर्यंत रुळणारी पांढरीशुभ्र दाढी, सरळ नाक, ललाटावर सदैव विराजमान असलेला कुंकुमतिलक, खडय़ा आवाजात शिवरायांचे चरित्र सांगताना आकाशाकडे झेपावणारे त्यांचे दोन्ही हात…  महाराष्ट्रातील शिवभक्तांनी डोळ्यांत साठवून ठेवलेला शिवशाहिरांचा एकूणच हा सगळा वेश आणि आवेश कोणालाही कदापि पुसता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये जो शिवकालीन इतिहास सामान्य जनतेपर्यंत कधीच पोहोचला नव्हता, तो बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या वाणीतून, लेखणीतून आणि नाटय़कृतीमधून जगभरात पोहोचविला. बाबासाहेब पुरंदरे हे फक्त शिवशाहीर नव्हते, तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे ते एक अविभाज्य अंग होते. शिवशाहीर पुरंदरेंनी आज जगाचा निरोप घेतला असला तरी इतिहासाच्या पानापानावर आपल्याला ते भेटतीलच. इतिहास कसा सांगावा आणि सामान्य लोकांपर्यंत तो कसा पोहोचवावा, याचा आदर्श वस्तुपाठ पुरंदरेंनी घालून दिला. बाबासाहेब इतके शिवमय झाले होते की, त्यांचं समग्र आयुष्य आणि व्यक्तिमत्त्व जणू शिवकाळातच वावरणारं, रमणारं बनून गेलं. सबंध महाराष्ट्राने ‘ज्ञानेश्वरी’ आणि तुकोबारायांच्या गाथेप्रमाणेच पारायणं केलेला आणखी एक ग्रंथ कुठला असेल तर तो बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेला ‘राजा शिवछत्रपती’. शिवछत्रपतींचा लोकविलक्षण चरित्रपट बाबासाहेब पुरंदरेंनी मोठय़ा

ताकदीने आणि वीररसाने

ओतप्रोत असलेल्या आपल्या वाणीने जगासमोर मांडला. शिवचरित्र आणि इतिहासाशी संबंधित बाबासाहेबांची 36 पुस्तके प्रसिद्ध झाली असली तरी ‘राजा शिवछत्रपती’ हे त्यांनी लिहिलेले शिवचरित्र आणि ‘जाणता राजा’ ही नाटय़कृती प्रचंड गाजली. लेखणीबरोबरच ओजस्वी वाणीतून ‘शिवचरित्र’ या एकाच विषयावर तब्बल 80 वर्षे बोलणारे आणि लिहिणारे बाबासाहेब पुरंदरे म्हणजे साक्षात सरस्वतीपुत्रच होते. शिवचरित्रावर देशविदेशांत बाबासाहेबांनी 12 हजारांहून अधिक व्याख्याने दिली. बाबासाहेबांच्या मुखातून शिवचरित्र असे काही रूप घेऊन बाहेर पडे की, वर्तमानाचा विसर पडून ऐकणारे थेट शिवकाळात जाऊन पोहोचत. बाबासाहेबांच्या वक्तृत्वातील जोश, आवेश आणि आवेगाचं सामर्थ्यच तसं होतं. पुण्याजवळच्या सासवड गावातील सरदार पुरंदरेंच्या वंशातील या तरुणाने गडकिल्ले आणि शिवचरित्राचा अभ्यास करता करता अवघं आयुष्य शिवचरणी लीन करण्याचा निश्चय केला. जेजुरीच्या खंडेरायाचा भंडारा भाळी मिरवत, गळ्यात तुळजा भवानीचा टाक लेवून आणि हातात शिवचरित्राचा अखंड तेजोमय पोत पाजळीत सह्याद्रीचा हा गोंधळी महाराष्ट्रभर बेभान होऊन नाचला, गायला. शिवचरित्राला सोप्या, गोड आणि रसाळ भाषेत महाराष्ट्रातील प्रत्येक अंगणात तुळशीच्या रोपटय़ाप्रमाणे रुजवत गेला. बाबासाहेबांनी सांगितलेलं हे शिवचरित्र महाराष्ट्ररसात भिजलं आणि मुरलंदेखील. महाराष्ट्राच्या मातीचा, शिवकाळाचा कस्तुरीहूनही मोहक असा गंध या शिवचरित्राला लाभला. शिवचरित्राशी संबंधित मोडी व फारसी भाषेतील हजारो, लाखो कागद गोळा करण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे आणि गो. नी. दांडेकर यांनी सह्याद्रीतल्या घळी, डोंगररांगा, झरे, पायवाटा, गुहा, गडकिल्ले, चोरवाटा, आडवाटा, खिंडी, दऱ्याखोऱ्या

सारे काही पालथे

घातले. कधी पायी, कधी सायकलवर तर कधी मिळेल त्या वाहनाने ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता भटकंती करून शिवशाहीचा सगळा इतिहास बाबासाहेबांनी जाणून घेतला आणि मगच तो लोकांसमोर मांडला. शिवचरित्राच्या माध्यमातून, ‘जाणता राजा’च्या प्रयोगातून आणि ‘महाराष्ट्रभूषण’, ‘पद्मविभूषण’सारख्या पुरस्कारांच्या मानधनातून मिळालेला पैसा बाबासाहेबांनी कॅन्सरचे रुग्ण, अनाथाश्रम, रुग्णालये, गरजू व गरीब विद्यार्थी आणि भूकंपग्रस्तांसाठी दान केला. तोदेखील या हाताचे त्या हाताला कळू न देता. महाराष्ट्रातील तरुणांच्या मनात इतिहासाबद्दल, गडकिल्ल्यांबद्दल आणि शिवचरित्राबद्दल रुची निर्माण करणाऱ्या या ऋषितुल्य सरस्वतीपुत्राचे अस्तंगत होणे ही महाराष्ट्राची मोठीच हानी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरे यांचे नाते तर अत्यंत जिव्हाळ्याचे होते. 50-60 वर्षांचा तो ऋणानुबंध होता. शिवसेनाप्रमुख ज्या मोजक्या लोकांच्या पायाला स्पर्श करत, त्यापैकी एक बाबासाहेब पुरंदरे होते. दोघांनाही इतिहासाचे वेड होते. बाबासाहेब इतिहास सांगत होते आणि बाळासाहेबांनी इतिहास घडविला. दोघांमध्ये अतूट असे नाते होते. दोघांचेही श्रद्धास्थान एकच. छत्रपती शिवराय! ‘‘शिवचरित्र ब्रह्मांडापलीकडे नेण्यासाठी मला सव्वाशे वर्षांचे आयुष्य हवे आहे’’, असे साकडे घालणारा आणि हयातभर शिवचरित्राची महापूजा मांडणारा बाबासाहेब पुरंदरे नावाचा शिवसाधक जणू शिवचरित्राच्या पारायणासाठीच आज ब्रह्मांडात लीन झाला. शिवरायांचा हा भक्त स्वर्गलोकात पोहोचल्यावरही देवादिकांच्या पाठी न लागता सर्वात आधी शिवरायांचा दरबार शोधून महाराजांना मानाचा मुजरा घातल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यभर शिवचरणाशीच आपली सेवा रुजू करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आता साक्षात स्वर्गलोकी शिवचरित्राचे आख्यान करतील, तेव्हा स्वर्गलोकातील समस्त देवादिक महाराजांवर, या आख्यानावर व शिवशाहिरांवर पुष्पवृष्टी केल्याशिवाय राहणार नाहीत!