
सामना ऑनलाईन । कन्नूर
केरळमधील सबरीमला मंदिरात महिलांनी प्रवेश केल्यानंतर वातावरण तापले आहे. राज्यभरात झालेल्या विविध हिंसाचाराच्या घटनांमध्ये 3,178 जणांना अटक करण्यात आली असून राज्यात हिंसाचाराच्या 1, 286 घटनांची नोंद झाली आहे. या प्रकरणी 37,979 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंसाचाराच्या घटनांमध्ये सुमारे 100 जण जखमी झाले आहेत. हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी पोलीस आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही लक्ष्य केले. हा हिंसाचार केरळमधील पी. विजयन सरकारने घडवून आणल्याचा आरोप भाजपने केला आहे.
सबरीमला मंदिरात महिला प्रवेशाचा वाद भाविकांच्या आस्थेशी संबंधित असून तो संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज होती. मात्र, केरळ सरकारने दडपशाही करून हा वाद चिघळवल्याचा आरोप भाजपने केला आहे. सरकारने हिंसाचाराला प्रोत्साहन देत भाविकांना मारहाण केल्याचेही भाजपने म्हटले आहे. सरकारने संवेदनशीलतेने प्रकरण हाताळण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. सरकारच्या प्रोत्साहनाने सुरू असलेल्या या हिंसाचारात भाविकानांच लक्ष्य करण्यात येत आहे. या प्रश्नावर राजकारण करण्याची गरज नव्हती. मात्र, राज्य सरकारने दडपशाहीचा वापर केल्याने हिंसाचार उफाळल्याचे भाजपने म्हटले आहे. मंदिराची परंपरा कायम ठेवण्यासाठी भाविक शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. मात्र, सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही भाजपने केला आहे.आता राज्य सरकार भाविकांना अटक करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचेही भाजपने म्हटले आहे.

























































