
मुंबईतील गिरणी कामगारांनी घाम गाळून, कष्ट उपसून मुंबईचे वैभव वाढविले. त्या गिरणी कामगारांना घरापासून वंचित होऊ देणार नाही. सरकार कुणाचेही असले तरी शेवटच्या कामगाराला घर मिळेपर्यंत लढणार अशी ग्वाही राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिली.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा अमृतमहोत्सवी वर्धापनदिन आणि दसरा मेळावा नुकताच परळच्या महात्मा गांधी सभागृहात पार पाडला. त्यावेळी आमदार सचिन अहिर बोलत होते. अनेक कारणांनी मुंबईबाहेर हद्दपार झालेल्या गिरणी कामगारांना परत मुंबईत आणण्यासाठी सहा कामगार संघटनांना मी राज्यमंत्री असताना एकत्र आणले आणि त्यातून लढा उभा राहिला. त्यामुळे सुरुवातीला जवळपास 35 हजार घरे कामगारांना मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली. मुंबईत आज ‘टॉवर कल्चर’ उभे राहत आहे, पण मुंबईचा गिरणी कामगार घराच्या स्वप्नापासून दूर जाता कामा नये. गिरणी कामगाराला मुंबईत घर मिळालेच पाहिजे, ही आमची मागणी असल्याचेही ते म्हणाले.
अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्ताने संघटनेत 25 वर्षे निष्ठापूर्वक वृत्तीने प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्यकर्त्यांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छाने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सरचिटणीस गोविंद मोहिते, ज्येष्ठ पत्रकार राहुल गडपाले आणि विलास बडे, अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष, दिग्दर्शक आणि निर्माते विजय पाटकर उपस्थित होते. सत्कारमूर्ती कार्यकर्त्यांचा गुणगौरव करताना सचिन अहिर म्हणाले, कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांच्या राष्ट्रीय विधायक विचाराने प्रेरित झालेल्या या कार्यकर्त्यांनी निवृत्तीनंतर जरी विविध राजकीय पक्षांत काम केलेले असले तरी त्याचे ‘सावट’ संघटना कार्यावर पडू दिले नाही. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेच्या ‘गौरव’ विशेषांकाचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन पार पडले. संघटनेचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, सेव्रेटरी शिवाजी काळे, सुनील अहिर उपस्थित होते.






















































