
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बुधवारी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. विश्वचषक 2023 च्या हिंदुस्थान-श्रीलंका सामन्याच्या आदल्या दिवशी वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी सचिन व्यतिरिक्त बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. मात्र, अनेक क्रिकेट चाहत्यांना या पुतळ्यातील सचिनचा चेहरा ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथसारखा असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा पुतळा पाहून अनेक चाहते बुचकळ्यात पडले आहेत.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे क्रिकेटमध्ये योगदान अमूल्य आहे. त्यामुळेच त्याला क्रिकेटचा देव असेही म्हणतात. फलंदाजीतील बहुतांश विक्रम आजही सचिनच्या नावावर आहेत. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके आणि धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टरच्या नावावर आहे. सचिनच्या क्रिकेटमधील योगदानाला सलाम करत, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कप 2023 दरम्यान बुधवारी 1 नोव्हेंबर रोजी त्याच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मुंबई क्रिकेट असोसिएशनने सचिन तेंडुलकर स्टँडजवळ हा पुतळा बसवला आहे.
पुतळ्यातील सचिनचा चेहरा ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ सारखा असल्याचे अनेक क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात आले आणि सोशल मीडियावर यासंदर्भात प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या पुतळ्यात सचिनला लोफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह खेळताना दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे सचिनप्रमाणे स्मिथही हा शॉट अतिशय कुशलतेने खेळतो. कदाचित या पुतळा चाहत्यांना स्मिथसारखा दिसण्याचे हे कारण असावे. सचिनचा चेहरा काहीसा स्मिथसारखाच आहे, त्यामुळे पुतळ्याबद्दल गंमतीदार प्रतिक्रियाही येत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘ पुतळा सचिनपेक्षा स्मिथ सारखा दिसतो.’ दुसऱ्या प्रतिक्रियेत म्हटले आहे, मागितला सचिन मिळाला स्टीव्ह स्मिथ.
एका चाहत्याने म्हटले आहे की, स्टीव्ह स्मिथचा पुतळा बनवला आणि नंतर तोच सचिनचा पुतळा असल्याचे सांगितले. एका चाहत्याने याबाबत संताप व्यक्त केला आहे. त्याने म्हटले आहे की, हा पुतळा स्टीव्ह स्मिथसारखा दिसतोय, यावर आपण नाराज आहोत. हा क्रिकेटचा देव असलेल्या सचिनचा अपमान आहे. एकाने आपल्या खास शैलीत ‘सचिन का नाम लेकर स्टीव स्मिथ पकड़ा दिया रे’ म्हणजेच सचिनचे नाव घेत स्टीव्ह स्मिथचा पुतळा माथी मारल्याचे म्हटले आहे.
सचिनच्या योगदानाला सलाम करण्यासाठी हा पुतळा उभारण्यात आला असला तरीही या पुतळ्याच्या दिसण्यावरून आता वाद हेण्याची चिन्हे आहेत. याबाबत सचिनच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे. याबाबत सोशल मिडीयावर प्रतिक्रियाही येत आहेत.




























































