आर्थिक अफरातफर प्रकरण – वाझेच्या जामिनावर शुक्रवारी फैसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिक अफरातफर प्रकरणात आरोपी असलेला बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालय 18 नोव्हेंबरला निर्णय देणार आहे. विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या न्यायालयात वाझेने फौजदारी दंड संहितेच्या कलम 88 अन्वये जामिनासाठी अर्ज केला. त्यावर दोन्ही बाजूकडील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सत्र न्यायाधीशांनी मंगळवारी वाझेच्या जामिनाचा निर्णय राखून ठेवला.

वाझेच्या वतीने अॅड. सजल यादव यांनी जामिनासाठी अर्ज केला. आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल करून वर्ष उलटले आहे. जर वाझेला आरोपपत्र दाखल करेपर्यंत अटक करण्यात आलेली नाही, मग आता अटक करण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित करीत अॅड. यादव यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राच्या आधारे वाझेला जामीन मंजूर करण्याची विनंती केली.

त्यावर ईडीच्या वतीने अॅड. सुनील घोन्साल्वीस यांनी तीव्र आक्षेप घेतला. वाझेची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तो जामिनावर तुरुंगाबाहेर आला तर साक्षीदारांवर प्रभाव टाकेल आणि पुराव्यांमध्ये छेडछाड करेल, असा दावा ईडीच्या वतीने करण्यात आला. दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी जामिनाचा निर्णय राखून ठेवला. या प्रकरणी 18 नोव्हेंबरला होणाऱया पुढील सुनावणी वेळी विशेष न्यायालय वाझेच्या जामिनाचा निर्णय जाहीर करणार आहे.