>> डॉ. सच्चिदानंद शेवडे
मध्य प्रदेशातील इंदूर येथील ज्येष्ठ पत्रकार, उत्तम चित्रकार, कवी आणि संगीत अभ्यासक श्रीकृष्ण बेडेकर यांनी 6 डिसेंबर रोजी वयाची 75 वर्षे पूर्ण केली. त्या अनुषंगाने बेडेकर अमृत महोत्सव समितीतर्फे बेडेकर यांच्या कार्याचा ओळख करून देणारा गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यातील ज्येष्ठ विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचा हा लेख.
‘आपकी नजरोने समझा प्यार के काबील मुझे’ हे माला सिन्हाच्या तोंडचे पण लतादीदींनी गायलेले आणि अत्यंत गाजलेले गीत ऐकताना आम्हाला कधीच काही खटकले नाही. पण जेव्हा श्रीकृष्ण बेडेकर यांचे ‘आदरणीय दीदी, याचा अर्थ काय?’ हे संतापकीय वाचले तेव्हा खाडकन डोळे उघडले आणि आपण गाणी नुसतीच ऐकतो अथवा पडद्यावर पाहतो हे प्रकर्षाने जाणवले. हे गीत गाणाऱया लतादीदींनी सावरकरांची गाणी गायली आहेत. किंबहुना सावरकरांचा सहवास त्या घराण्याला लाभला होता. अशा वेळी सावरकरांचे, ‘अन्य हिंदुस्थानी भाषाभगिनींपैकी एक म्हणून आम्ही उर्दूचा सन्मान करू, पण तिने आपली मर्यादा ओलांडून आम्हाला डोईजड ठरू नये’ हे मत त्यांना ठाऊक असायला हवे. मग एक अनपढ सोज्वळ हिंदू स्त्राr गाण्यात ‘बंदा परवर शुक्रिया’ कसे म्हणेल? आणि नजर, काबील, मंजूर, फैसला आदी उर्दू शब्द तरी तिला कसे ठाऊक असतील हा विचार ना गीतकाराने केला आणि ना गायिकेने केला. बेडेकरांचे हे दुःख ते संतापकीयातून व्यक्त करतात तेव्हा ते अगदी सहजपणे पटते. गायकाने आणि गीतकाराने किती विचार करायला हवा हे बेडेकरांसारखा कवी आणि गायक जाणतो तेव्हाच व्यक्त होतो. आजकाल कोणीही उठतो आणि कवी बनतो. भाषा चांगली असली की गाणी पाडणे हा मुळात बेडेकरांचा पिंड नाही. त्यामळे अशा बनचक्या कवींना उद्देशून ते सहजपणे लिहून जातात,
ते व्यर्थ मैथुनाचा सांभाळली हिशेब
मातीकडे ज्यांचे उगणे गहाण आहे.
आंतर्देशीय पत्रावर मासिक ही कल्पना अगदी नावीन्यपूर्ण होती. त्यातील ‘संतापकीय’ हा खास बेडेकरी शब्द नमुना म्हणायला हवा. मुळात संपादकीय या शब्दाला एखाद्या संपादकाने ‘संतापकीय’ हा शब्द वापरावा हेच एक वेगळे वैशिष्टय़ म्हणायला हवे. अलीकडे शब्दनिष्ठ विनोद लुप्तप्राय होऊ लागले आहेत. विनोदांनाही राजकीय झालर चढू लागली आहे. अशा वेळी वेगवेगळे विषय हाताळून शब्दनिष्ठ विनोदाची परंपरा इंदूरला राहूनही बेडेकरांनी जपली आहे हे विशेष. भाषेतील उपहास आणि उपरोध योग्य ठिकाणी उपयोगात आणणे आणि त्यायोगे मखमली चिमटे काढणे हे त्यांना सहजसाध्य झाले आहे. ‘अब काहे घुमान करे’, ‘मरणोत्तर भारतरत्न-एक थोतांड’ यांसारखी अनेक संतापकीये सांगतां येतील. खरे तर कोणी निवडायला सांगितले तर जड जावे असे ते सर्वच लेख आहेत. प्रत्येकाबद्दल एक वेगळा लेख लिहावा लागेल अशा वजनाचे ते लेखन आहे. तब्बल एकवीस वर्षे पत्र ‘सारांश’सारखा दीड पानी अंक काढणे आणि तो चालविणे हे साधेसुधे काम नव्हे. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे! पत्र सारांश. ही भन्नाट कल्पना त्यांनी त्यामुळेच राबविली. सरकारी आंतर्देशीय पत्रावर चक्क ज्येष्ठांचे साहित्य छापले आणि ज्यांचे छापता आले नाही त्यांची नावे छापून क्षमा मागितली. असे जगावेगळे काम तेच करू जाणे. या कल्पनेला मात्र अनेकांनी उचलून धरले. नाही म्हणायला अगदी पहिल्या अंकाला एका महाभागाने निनावी पत्र पाठवून अपमानास्पद भाषा वापरून त्यांचा उद्धारही केला. तो त्यांनी हसत झेलला म्हणूनच पुढे नेटाने अंक चालवू शकले.
आजच्या शुद्धलेखनाच्या अवस्थेमुळे साधे साधे मराठी शब्द वाचायची मारामार होणारी पिढी आपण पाहत आहोत. तिथे शब्दांचे अर्थ समजणे हे आणखी दुरापास्त झाले आहे. शब्द तरी किमान नीट उच्चारला जावा म्हणन बेडेकरांनी शक्कल लढवून शब्द दरवळचे चक्क ‘शब्द दर्वळ’ केले. दर्वळ हा शब्द कोणत्याही शब्दकोशात नाही. लोकांनी ‘दखळ’ असे वाचू नये यासाठी नवी रचना केल्याचे त्यांचे म्हणणे पटायला हरकत नसावी. त्यासाठी त्यांनी अनेकांची टीका सहन केली, पण आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
बेडेकरांचे साधे पोस्टकार्ड आले तरी त्यांनी स्वाक्षरीच्या बाजूला पोस्ट खात्यासाठी ‘छापील नाही सबब- दंड’ आकारू नये’ अशी सूचना लिहिलेली असते. इतके अप्रतिम अक्षर आजकाल पाहायला मिळणे दुर्मिळ झाले आहे.
अक्षर असावे टपोरे गोल ।
जैसे मोगेरीचे उमले फूल ।
पाहताच लागावी चाहूल । भगवंताची।।
दृष्ट लागावी असे मोत्यांसारखे अक्षर त्यांनी प्रयत्नपूर्वक साध्य केले. यातून त्यांची चिकाटी आणि एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की ती पूर्णत्वाला नेण्याची यशस्वी धडपड दिसून येते.
मराठीला नव्या शब्दांचे लेणे चढविण्याची अनेकांनी पराकाष्ठा केली आहे. शिवराय, चिपळूणकर, सावरकरादी व्यक्तींनी नवे शब्द निर्माण करून भाषेत मोलाची भर घातली. बडोद्याच्या गायकवाड संस्थानाचा ‘श्री सयाजी’ शासन कल्पतरू’ आणि सावरकरांपासून स्फूर्ती घेऊन माधव ज्युलियन यांनी निर्मिलेला ‘भाषा शुद्धी विवेक’ या ग्रंथांनी तेच कार्य केले. या सर्वांमागील हेतू हाच होता की परके शब्द उपयोगात आणले तर भाषेत भर पडत नसून स्वभाषेतील त्या अर्थाच्या शब्दाचा खून होतो, तो न व्हावा.
अकारण परके शब्द उपयोगात का आणावेत? यातून आपण आपल्या भाषेबद्दल किती अज्ञ आहोत याचे प्रदर्शन करण्यासारखे आहे. जी वस्तू ज्या भाषेत नसते तिला त्या भाषेत शब्द नसतो हे स्वाभाविक आहे. तथापि शब्द असूनही परक्या शब्दांचा अट्टहास का? या नव्या शब्दकारांच्या मांदियाळीत श्रीकृष्ण बेडेकरांचे नाव आवर्जून घ्यायला हवे. त्यांनी केवळ प्रतिशब्दच नव्हेत तर अर्थवाही समांतर शब्दही दिले आहेत. डेड एंडला ते पथान्त म्हणतात तर सी फेस रोडला सागर तट मार्ग असा छान शब्द सुचवतात. फोनला दूरसंवादी तर मोबाईलला भ्रमणसंवादी म्हणतात. काही मोठय़ा शब्दांचे अर्थवाही लघुरूप त्यांनी मस्त केले आहे. सामाजिक प्रदूषणाची व्यापकता असे म्हणण्यापेक्षा गाढूळ्य हा शब्द तर काव्य नाही ते नाव्य-असे नवे शब्द देतात. सप्रेम नमस्काराला स्नेहाभिवादन, तर सप्रेम भेटला ते स्नेहार्पित असा जवळीक वाटणारा आणि जवळीक वाढवणारा शब्द ते सहजपणे देतात.
असे अनेक शब्द त्यांच्या पोतडीत आहेत. वेळेनुसार ते बाहेर पडतील यात मुळीच शंका नाही. कवी, साहित्यिक, नाटककार, संपादक, गायक, रांगोळीकार आणि उत्तम चित्रकार असणारा हा माणूस म्हणजे एक चालती बोलती संस्था आहे. या संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा देतोच, पण यथावकाश शतक महोत्सव साजरा करण्याचे भाग्य आम्हाला लाभो अशी कामना व्यक्त करतो.




























































