अजरामर योद्धा – सदाशिवरावभाऊ

1080

>> आसावरी जोशी

स्वराज्याचा…मराठी साम्राज्याचा धगधगता इतिहास…या देदिप्यमान इतिहासाची भुरळ कलाक्षेत्राला पडली नसती तरच नवल. यातूनच अनेक ऐतिहासिक चित्रपट बॉलिवूडमध्ये निर्माण होत आहेत. नुकताच पानिपत चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पेशवाईतील अनेक व्यक्तिरेखा आपल्याला परिचित आहेत. पण पानिपताचे युद्ध हरुनही जे अपराजित ठरले ते श्रीमंत सदाशिवराव भाऊ मात्र काहीसे दुर्लक्षितच राहिले…पाहुया या निधडय़ा…शुरवीर योद्धय़ाविषयी थोडे सविस्तर.

अब्दालीने भाऊसाहेबांची आणि त्यांच्या शौर्याची तारीफ आणि वर्णन केलेली पत्रे सापडतात. अब्दालीने सवाई माधोसिंगास लिहिलेली ही पत्रे आहेत. येथे त्याने भाऊसाहेबांचा आवेश आणि मराठा सैन्याचा जोश याचे भरभरून वर्णन केले आहे. पानिपतचा विजय हा केवळ नशिबाने मिळालेला विजय असे तो मानतो.

इतिहास… आपल्या मराठेशाहीचा जाज्वल्य इतिहास… जिजाऊ आणि शिवरायांनी घडविलेल्या, स्वाभिमान शिकविलेल्या स्वराज्याचा धगधगता ऐश्वर्यसंपन्न इतिहास. छत्रपती शिवरायांनंतर, छत्रपती शंभूराजांनंतर इतिहासाची पाने विविध अंगांनी, विविध रंगांनी लिहिली गेली. किंबहुना घडली गेली. कारण छत्रपती शिवरायांच्या या स्वराज्याने, त्यांच्या प्रेरणेने अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाचा आंतरवन्ही चेतविला होता आणि तो सतत धगधगता आणि तेवता होता. त्यातूनच प्रत्येकाने, अगदी प्रत्येकाने आपापल्यापरीने स्वराज्याच्या, स्वातंत्र्याच्या या अग्निहोत्रात आपली निष्ठेची, त्यागाची, शौर्याची समिधा अर्पण केली. त्यातूनच औरंगजेबाच्या कटकारस्थानांना शह देऊन, झुंज देऊन महाराणी येसूबाईंची सुटका झाली. छत्रपतींच्या दोन गाद्या झाल्या आणि राज्यकारभार सांभाळण्यासाठी, स्वराज्य वाढविण्यासाठी पेशवाई जन्माला आली.

पेशवाई… मराठी साम्राज्याचे एक भरजरी, वैभवसंपन्न पर्व. या पेशवाईला अनेक अंगे आहेत, बाजू आहेत, प्रवाद आहेत. अनेक कथा, दंतकथा या पेशवाईशी जोडल्या गेल्या आहेत. छत्रपती शिवरायांचे स्वराज्य हे अपरिमित कष्टातून, असंख्यजणांच्या त्यागातून, निढळाच्या घामातून, रणांगणात सांडलेल्या रक्तातून, गनिमी काव्यातून, पाचही शाह्यांना झुलवीत शिवरायांच्या अत्यंत प्रतिभासंपन्न बुद्धीचातुर्यातून जन्माला आले. हे स्वराज्य अर्थातच ऐश्वर्यसंपन्न होते, समृद्ध होते, पण त्यात श्रीमंतीचे फाजील महागडे शौक नव्हते.
पण.. हे स्वराज्य राखण्यासाठी जन्माला आलेल्या पेशवाईने ही गरज नसलेली श्रीमंती आणि स्वराज्याला न शोभणारे शौक ठेवले आणि दाखविले. विनाकारण श्रीमंती थाट दाखवणाऱया पंचपक्वान्नांच्या जेवणावळी, तासन्तास चालणारी देवपूजा, अंगावर येणारा श्रीमंती डामडौल, अंगवस्त्रे…. आणि बरेच काही…!

शिवरायांना सर्वस्व मानणाऱया, शिवविचारांना आंतरबाह्य स्वतःत भिनवणाऱया माझ्यासारख्या शिवप्रेमींना ही पेशवाई नेहमीच खटकत राहते, पण पेशवाईच्या या बाजूसोबत तिला असीम पराक्रमाचीही झळाळती किनार आहे, ज्यात राऊंचे दिल्लीपर्यंत धडकलेले अतुलनीय शौर्य आहे, चिमाजीआप्पांचा पराक्रम आहे, पहिल्या माधवराव पेशव्यांचा संयत करारीपणा व निर्णयक्षमता आहे आणि…

आणि एका अगदी सहज विस्मरणात गेलेल्या अपराजित योद्धय़ाची अजरामर कहाणी आहे. श्रीमंत सदाशिवरावभाऊ पेशवे.! होय, एक अपराजित, अजरामर योद्धा. पानिपत. मराठेशाहीच्या इतिहासातील एक अजूनही भळभळणारी, जिव्हारी लागलेली जखम. अफगाणिस्तानातून आक्रमण करणाऱया अहमदशाह अब्दालीला थोपविण्याची जबाबदारी चिमाजीआप्पांचे शूर चिरंजीव सदाशिवरावभाऊ स्वतःकडे घेतात आणि प्रचंड मोठय़ा लवाजम्यासहित पुण्याहून पानिपतच्या दिशेने प्रयाण करतात.

पहिले बाजीराव अर्थात राऊंचे धाकटे बंधू चिमाजीआप्पा यांचे आईविना पुत्र सदाशिवरावभाऊ, आजी राधाबाईसाहेब आणि काकू काशीबाईसाहेब यांच्या हाती ते मोठे झाले. भाऊंनी दौलतीचे शिक्षण खुद्द शाहू महाराजांकडे घेतले. त्यामुळे भाऊ तलवारीत जेवढे तरबेज तितकेच लेखणीतही निपुण झाले. पेशवाईच्या कारकुनी कारभारात भाऊंनी आपल्या लेखणीतून पारदर्शकता आणली. कृष्णा, तुंगभद्रेच्या प्रांतातील थकलेली खंडणी केवळ लेखणीच्या जोरावर वसूल केली. राऊंचे पुत्र बाळाजी बाजीराव अर्थात नानासाहेब पेशवे यांचे भाऊंवर विशेष प्रेम होते. कनिष्ठ पेशवे अर्थात राघोबादादांचे अटकेपार झेंडे संपूर्ण इतिहासात प्रसिद्ध आहेत. पण या मोहिमेतील अवास्तव खर्च आणि कर्ज भाऊंनी राघोबादादांचा रोष पत्करून निदर्शनास आणून दिला.

नानासाहेबांचा भाऊंच्या लेखणीइतकाच तलवारीवरही विश्वास असल्याने पानिपतच्या अवघड मोहिमेसाठी भाऊंची निवड करण्यात आली. भाऊंचा आपल्या सैन्यावर, स्वतःच्या युद्धकौशल्यावर आणि तोफखान्यावर मजबूत पकड आणि विश्वास होता. त्यामुळे अब्दालीशी गनिमी काव्याने न लढता थेट रणांगणात भिडायचे ठरविले. अब्दालीकडे एक लाखाची फौज होती आणि भाऊंकडे फक्त पन्नास हजारांची. 17 मार्च 1760 रोजी भाऊसाहेबांनी सिंदखेड सोडले आणि अब्दाली पळून जाण्याच्या तयारीची इतिहासात नोंद आहे, पण नजीबखानाने त्याला थोपवून धरले. 17 ऑक्टोबरला भाऊंनी कुंजपुरा आणि तेथील किल्ला जिंकून घेतला. कुंजपुऱयात 3-4 लाख रुपये रोख सापडले. किल्ल्याला खणते लावून किल्ला खणून काढला. त्यात दहा हजार खंडी गहू सापडला. हा मोठा विजय घेऊन भाऊ पुढे निघाले. तोपर्यंत अब्दालीने यमुनामाय ओलांडली हे कळताच भाऊंनी पानिपतात तळ ठोकून त्याची वाट अडवली. पुढील अडीच महिने भाऊंनी अब्दालीला अगदी सळो की पळो करून सोडले, पण डिसेंबरमध्ये परिस्थिती पालटली. सैन्याची रसद संपली, अन्नाचा तुटवडा पडू लागला. भाऊसाहेबांचा दक्षिणेशी असलेला संपर्क अचानक तुटला. नानासाहेबांना येणारी पत्रे बंद झाली. भाऊसाहेबांना मदत करण्यासाठी नानासाहेब पानिपतच्या दिशेने रवाना झाले, पण पानिपताची ही झुंज भाऊसाहेबांची एकाकी झुंज ठरली. नानासाहेबांचा पुत्र विश्वासराव कामी आला. तेव्हा आपल्या सैन्याचे मनोबल उंचावण्यासाठी भाऊसाहेब हत्तीवरून उतरून पन्नास अफगाण्यांच्या गराडय़ात एकटे त्वेषाने शिरले. त्यांना अखेरचे लढताना नाना फडणवीसांनी पाहिले आणि अचानक भाऊ दिसेनासे झाले.

पुढे भाऊसाहेबांचे काय झाले…???
पानिपतपासून हरयाणातील रोहटक जिल्ह्यात सांघी नावाचे गाव आहे. तेथील ग्रामस्थ अत्यंत ठामपणे मानतात की, भाऊसाहेब लढाईनंतर जिवंत होते आणि ते या गावात येऊन राहिले होते. या गावात भाऊंच्या नावे अजूनही एक आश्रम आहे. आश्रमाचे नाव डेरा लाधीवाला. येथेच श्री सिद्धबाबा सदाशिवराय अर्थात भाऊसाहेबांची गादी आहे. ग्रामस्थांच्या समजुतीनुसार भाऊंनी येथे नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. 1764 मध्ये पठाणांच्या हल्ल्यातून गावाला वाचविण्यासाठी तरुणांची एकजूट करून त्यांना युद्धकला शिकविली आणि पठाणांचा पराभव केला. आजही भाऊंचा मठ 20 एकर जागेवर पसरलेला आहे. अनेक लोककल्याणाची कामे तिथे चालतात. येथेच भाऊसाहेबांनी समाधी घेतली. समाधीच्या दिवशी अजूनही येथे जत्रा भरते. भाऊसाहेबांनी शिकविलेली शक्ती उपासना म्हणून कुस्तीचे फड भरविले जातात. गावातली तरुणाई या भाऊंच्या गादीला आजही मानते.

आपल्याकडे भाऊ आले, तोतया आला, असे अनेक प्रवाद उठले. पानिपतच्या पराभवाची कारणे शोधली गेली. आजच्या काळात या सव्यापसव्यात मला पडायचे नाही. मला इतिहास वाचल्यावर दिसले आणि जाणवले ते इतकेच की, आपण फक्त भाऊसाहेब आहेत की नाही याचा ऊहापोह करीत राहिलो, पण कोण कुठल्या हरयाणातील अशिक्षित ग्रामस्थांनी भाऊंच्या पराक्रमालाच आदर्श मानून त्यांना खऱ्या अर्थाने अजरामर केले.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या