पुणे पुस्तक महोत्सवात ठरलेला साधना प्रकाशनाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द; निर्णयाचा साधना प्रकाशनाडून निषेध

फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या मैदानावर 16 डिसेंबरपासून सुरु झालेल्या पुणे पुस्तक महोत्सवात साधना प्रकाशनाच्या राजन हर्षेलिखित “पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात” या पुस्तकावर गुरुवारी होणारा चर्चेचा कार्यक्रम नॅशनल बुक ट्रस्टकडून (एन. बी. टी. ) ऐनवेळी रद्द करण्यात आला. या निर्णयाचा निषेध करून तो कार्यक्रम आता 22 डिसेंबरला सकाळी 10.30 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभागृहात करण्याचे साधना प्रकाशनाने ठरवले आहे.

एन.बी. टी. ने 5 डिसेंबर रोजीला 16 ते 24 डिसेंबर या काळात होणाऱ्या पुस्तक महोत्सवात पुस्तक व लेखक यांच्याशी संबंधित कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास प्रस्ताव द्यावा ,असे पत्र साधना प्रकाशनालाही पाठवले होते. त्यानुसार 8 डिसेंबर रोजी साधना प्रकाशनाने, राजन हर्षे लिखित “पक्षी उन्हाचा” या नव्या पुस्तकावरील चर्चेचा प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला उत्तर देताना , या संदर्भात आमच्या प्रतिनिधी आकांक्षा बिष्णोई यांच्या संपर्कात राहावे, असे एन. बी. टी.ने कळवले होते . त्यानंतर 12 डिसेंबरला, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या गेस्ट हाऊसवर साधनाच्या आकांक्षा व त्यांच्या सहकारी निहारिका यांची भेट घेतली. तेव्हा सुहास पाटील, गोपाळ नेवे व साईनाथ जाधव हे साधनाचे तीन सहकारीही उपस्थित होते, असे विनोद शिरसाठ यांनी सांगितले.

त्या भेटीतच आकांक्षा व निहारिका यांनी महोत्सवाचे वेळापत्रक पाहून 21 डिसेंबर दुपारी 2 ते 3 ही एक तासाची वेळ निश्चित केली. लेखक डॉ राजन हर्षे हे फर्ग्युसनचे माजी विद्यार्थी असल्याने आणि कार्यक्रमाला येणारा वाचकसमूह लक्षात घेतन फर्ग्युसनचे अँफी थियेटर हे स्थळही कार्यक्रमासाठी तेव्हाच त्यांनी निश्चित केले. कार्यक्रमाचे पाहुणे व स्वरुप कळविण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे, चर्चेचे स्वरूप व वक्त्यांची नावे त्यांना दुसऱ्या दिवशी कळवण्यात आली. अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू असलेले लेखक डॉ राजन हर्षे, नांदेड येथील स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ पंडित विद्यासागर , मुंबई विद्यापीठाचे माजी रजिस्ट्रार डॉ. सतीश बागल हे चौघे या पुस्तकावर चर्चा करणारे होते. डॉ संकल्प गुर्जर हे या चर्चेचे संचलन करणार होते.

कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी साधनाचे सुहास व सुदाम हे दोन सहकारी आकांक्षा यांना भेटले तेव्हा त्यांना कार्यक्रमाचे स्थळही (अँफी थियेटर ऐवजी बुक कट्टा ) त्यांनी दाखवले होते. मात्र कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सायंकाळी 7 वाजता आकांक्षा बिष्णोई यांनी फोन करून महोत्सवाच्या ठिकाणी अनेक कार्यक्रम होणार असल्याने तुमचा कार्यक्रम रद्द करावा लागत आहे. या पुस्तकाचा विषय, कार्यक्रमाला येणारे निमंत्रित वक्ते आणि साधना प्रकाशनाचा पाऊण शतकाचा वारसा हे सर्व लक्षात घेता, कार्यक्रम रद्द झाल्याचे असे ऐनवेळी सांगणे योग्य नाही, असे आकांक्षा यांना सांगितले. तेव्हा, वरिष्ठांशी बोलून थोड्या वेळाने फोन करून सांगते, असे त्या म्हणाल्या. मात्र अर्धा तासाने फोन करून त्यांनी, कार्यक्रम रद्दच करावा लागत आहे असे कळवले.

या निर्णयाचा आम्ही निषेध करीत आहोत. मात्र, सर्व वक्त्यांची वेळ व हॉलची उपलब्धता हे सर्व काल रात्री ठरवले असून, तेच सर्व वक्ते घेऊन तो कार्यक्रम 22 डिसेंबरला सकाळी 10.30 वाजता , महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभागृह, टिळक रोड, पुणे येथे आयोजित करीतअसल्याचे साधना साप्ताहिकचे संपादक विनोद शिरसाठ यांनी कळविले आहे.