‘वर्ल्ड बुक ऑफ लंडन’मध्ये साईबाबांची रांगोळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिर्डी येथे नुकताच झालेल्या रामनवमी उत्सवावेळी डोळ्यांचे पारणे फेडणारी 40 हजार स्के.फुटांच्या श्री साईबाबांच्या रांगोळीची ‘वर्ल्ड बुक ऑफ लंडन’मध्ये दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या उत्सवात प्रथमच अशाप्रकारे शिर्डीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

यंदा शिर्डी शहरात श्री साईबाबांचा रामनवमी उत्सव मोठय़ा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. तीन दिवसीय आयोजित उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन श्री साईबाबा संस्थान तसेच शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

या कार्यक्रमात पहिल्यांदाच साईनगर येथील मैदानावर गायीच्या शेणाने तसेच गोमूत्र टाकून त्यावर 40 हजार स्के.फुटांची भव्य अशी श्री साईबाबांची रांगोळी साकारण्यात आली होती. यासाठी सुमारे 7 हजार किलो रांगोळीचा वापर केला गेला. मुंबई येथील 40 कलाकार यांच्या अथक प्रयत्नांनी ही सुरेख रांगोळी साकारण्यात आली. या रांगोळीची ‘वर्ल्ड बुक ऑफ लंडन’ मध्ये घेण्यात आली. त्यापार्श्वभूमीवर बुधवारी (दि.13) सायंकाळी ‘वर्ल्ड बुक ऑफ लंडन’ चे संतोष शुक्ला, दिलीप पंडित, मेहमूद सैय्यद यांच्या हस्ते यात्रा कमिटीच्या सदस्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. ही बाब शिर्डी ग्रामस्थांसाठी भूषणावह बाब असल्याचे रामनवमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष कमलाकर कोते यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष कैलास कोते, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, शिर्डी रामनवमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष कमलाकर कोते, नीलेश कोते, नितीन कोते आदींसह मुंबई भांडुप येथील रांगोळी कलाकार सुर्वे, रांगोळी कमिटीचे मुकुंद गोंदकर, मनिलाल पटेल, प्रकाश गोंदकर, प्रतीक शेळके आदी मान्यवरांसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी रांगोळी कलाकारांचा यात्रा कमिटीच्या वतीने सर्टिफिकेट व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.