
ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासून ते त्याच्या व्हीएफएक्सपर्यंत वाद निर्माण होऊन देखील प्रेक्षकांना या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
या चित्रपटात बाहुबलीफेम प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर क्रिती सेनन या चित्रपटात सीतेच्या भूमिकेत आहे. रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान झळकताना दिसणार आहे. पण, या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये मात्र तो सहभागी होणार नाही, असं बोललं जात आहे.
आदिपुरुष या चित्रपटाचं प्रमोशन संपूर्णतः प्रभासवर केंद्रित करण्यात येणार आहे. प्रभासने प्रमोशनसाठी मे महिन्याच्या तारखा दिल्या आहेत. त्यानुसार प्रमोशनचं नियोजन करण्यात आलं आहे. पण, सैफ अली खान याच दरम्यान सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कुटुंबासोबत बाहेर जाणार असल्याने तो प्रमोशनमध्ये सहभागी होणार नाही.
या चित्रपटाचं दिग्दर्शन तान्हाजी, लोकमान्य फेम ओम राऊत यांनी केलं आहे. तर निर्मिती भूषण कुमार यांनी केलं आहे. या चित्रपटाचं बजेट 500 कोटी आहे. त्यातील निम्मे यातील व्हिज्युअल इफेक्टवर खर्च करण्यात आले आहेत. हा चित्रपट हिंदी, तेलुगू अशा दोन भाषांमध्ये चित्रीत करण्यात आला असून तो या दोन भाषांसह तमिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. आदिपुरुष येत्या 16 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.































































