सलील कुलकर्णी घरी जाऊन ऐकवणार गाणी; ज्येष्ठ चाहत्यांना सुरेल भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गायक, संगीतकार सलील कुलकर्णी अनोखी संकल्पना घेऊन रसिकांच्या भेटीला आले आहेत. सलील कुलकर्णी यांची ही संगीतमय भेट आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी! संगीताचे दर्दी रसिक जे वयोमानानुसार घराबाहेर पडू शकत नाहीत त्यांना सलील घरी जाऊन गाणी ऐकवणार आहेत. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचे कौतुक होत आहे.

कलेची सेवा, ज्येष्ठांची सेवा या उपक्रमाबद्दल सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून माहिती दिली आहे. सलील यांनी म्हटलंय, आपल्याकडे अनेक वर्षे गाण्याच्या उत्तमोत्तम मैफली ऐकणारे अनेक रसिक आहेत. त्यांच्यापैकी काही जण आता वयोमानानुसार घराबाहेर पडू शकत नाहीत. अगदी काल -परवासुद्धा कार्यक्रमांत भेटणारे अनेक रसिक बोलता बोलता सांगत होते की, आमचे आई, बाबा किंवा मावशी, काका पूर्वी तुमच्या मैफलीला नक्की यायचेच, पण आता ते थकले आहेत किंवा आजारी आहेत, त्यामुळे त्यांना घराबाहेर पडता येत नाही. लाईव्ह गाणं ऐकणं या गोष्टीचं महत्त्व किती आहे, हे आपल्या सगळ्यानांच आताच्या काळाने दाखवून दिलं आहे.  तर… या ज्येष्ठ मंडळींना नाटय़गृहापर्यंत येता येणार नाही…पण मी त्यांना भेटून अर्धा तास गाणी नक्की ऐकवू शकतो!

सलील यांच्या पोस्टवर अनेकांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. अनेकांनी ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधून गाणं ऐकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच काही सहकलाकारांनी या उपक्रमात सलील यांची साथ देण्याची तयारी दर्शवली आहे. ज्येष्ठ मंडळींना आनंदाचे काही संगीतमय क्षण देण्यापलीकडे माझा काहीही उद्देश नाही तसाच प्रामाणिक हेतू असणाऱया लोकांनीच संपर्क करा, असे आवाहन सलील यांनी केले आहे.

ज्या घरात रसिक आजी–आजोबा आहेत आणि ते कार्यक्रमाला येऊ शकत नाही, त्यांच्या घरी येऊन त्यांची सेवा म्हणून, त्यांना भेट म्हणून काही गाणी ऐकवायची इच्छा आहे. डिसेंबरपासून महिन्यातून किमान एखाद्या जोडप्याला किंवा ग्रुपला असा आनंद देऊ शकलो तर खूप समाधान मिळेल.