
संभाजीनगर शहरातील मालमत्ताधारकांना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मोठा दिलासा दिला आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशावरून मालमत्ता करावरील शास्तीच्या रकमेत 75 टक्के सवलत देण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. अशी माहिती मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.
मनपाची शहरातील नागरिकांकडे मालमत्ता कराची अडीचशे कोटीहून अधिक थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी मनपा प्रशासकांनी टास्क फोर्स स्थापन केली आहे. परंतु थकबाकीवर मोठ्या प्रमाणात शास्ती आकारली जात असल्याने शहरवासीयांकडून त्यात सवलत देण्याची मागणी होत होती. त्याची दखल घेत पालकमंत्री देसाई यांनी शास्तीत सवलत देण्याची सूचना केली होती. त्यानुसार आता मनपा प्रशासकांनी शास्तीच्या रकमेत 75 टक्के सवलत जाहीर केली आहे. या सवलती मुळे 31 मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणात कर संकलन होण्यास मदत होईल असे पाण्डेय सांगितले.

































































