
सामना प्रतिनिधी, नगर
संगमनेर तालुक्यातील आश्वीखुर्द परिसरातील प्रवरा नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा करणार्या प्रशांत कोडिलकर, अनिल कोकजे, केदार ढापरे, यांच्यासह त्यांचे मजूर व वाहन चालक यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, असे निवेदन 14 मे 2019 रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना देऊनही अद्यापपर्यंत कार्यवाहीस विलंब होत असल्याने येत्या आठ दिवसांत संबंधितांवर कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बेबी ममता दातीर यांनी दिला आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील गट नं.371/2 लगत असलेल्या प्रवरा नदी पात्रातून अनिल कोकजे, प्रशांत कोडिलकर, केदार ढापरे यांनी स्वत: व मजूरांच्या सहाय्याने हजार-बाराशे ब्रास बेकायदा वाळू उपसा सुरु असून, याबाबत मंडल अधिकारी तलाठी व प्रांत यांच्याशी पत्रव्यवहार करुनही संबंधितांनी कार्यवाही केली नाही. त्यामुळे थेट जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली, परंतु 15 दिवस उलटूनही कार्यवाहीस विलंब होत आहे. येत्या 8 ते 10 दिवसात पाऊस आल्यानंतर संबंधित वाळूचे खड्डे बुजण्याची भिती असून, यानंतर पुरावा नष्ट होऊन संबंधितांवर कारवाई करणे जिकरीचे होईल, त्यामुळे याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
























































