पोलीस मुख्यालयातीलच चंदनाची झाडे नेली कापून! विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चोरटय़ांनी थेट पोलीस मुख्यालयालाच आव्हान दिले असून, मुख्यालयाच्या हद्दीत घुसून पुन्हा एकदा चंदनाच्या झाडांची चोरी केली आहे. काही वर्षांपूर्वी पोलीस अधीक्षकांच्या बंगल्याशेजारी असलेल्या चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती. त्यावेळी झाडे चोरीला जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी धाव घेतल्याने चोरटय़ांनी चोरलेले बुंधे कुंपणाशेजारी टाकून पळ काढला होता. यावेळी मात्र चोरटे तेथील ट्रफिक पार्कमधील दोन झाडांचे बुंधे घेऊन जाण्यात यशस्वी झाले आहेत. या चोरीची नोंद विश्रामबाग पोलिसांत झाली आहे.

चोरटय़ांनी मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास पोलीस मुख्यालयातील ट्रफिक पार्कमधील चंदनाच्या झाडांची चोरी केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई दीपक तुकाराम वडेर यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. चोरटय़ांनी संबंधित झाडे करवतीने कापली आहेत. त्यानंतर फांद्याकडचा भागही कापून तेथेच टाकला आहे आणि केवळ दोन बुंधे घेऊन पोबारा केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे चार हजार रुपये किमतीचे चंदनाच्या झाडांचे दोन बुंधे चोरीला गेल्याची नोंद केली आहे. या गुह्याचा तपास सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील करीत आहेत.

घरफोडी, मोबाईलचोरी, वाहनचोरी याबरोबरच ‘धूम’ स्टाइलने महिलांकडील मौल्यवान ऐवज हिसका मारून पळविणाऱया चोरटय़ांचा सुळसुळाट वाढला आहे. यात भर म्हणून की काय, चोरटय़ांनी आता थेट पोलीस मुख्यालयाच्या परिसरात घुसून चंदनाच्या झाडांची चोरी केली आहे.

पोलीस जागरूक असतानाही चोरटय़ांनी संधी कशी साधली?

यापूर्वी चंदनचोरांनी चक्क पोलीस अधीक्षकांच्या बंगल्याच्या कुंपणानजीकचीच चंदनाची झाडे कापली होती. कापलेले बुंधे कंपाऊंडच्या भिंतीवरून बाहेर रस्त्यावर आणले जात असताना, चोरटय़ांचा सुगावा लागला होता. सहा ते सात चोरटे असल्याचेही दिसले होते. त्यानंतर पोलिसांना आपली चाहूल लागल्याचे लक्षात येताच चोरटय़ांनी धूम ठोकली होती. आता पुन्हा चोरटे 24 तास पोलिसांचा वावर असलेल्या पोलीस मुख्यालय परिसरात घुसून चोरी करीत असल्याचे समोर आले आहे. सर्वसामान्य नागरिक व्यायामाच्या निमित्ताने तेथील मैदानाभोवती चकरा मारू लागले की, राखीव असलेले पोलीस नागरिकांना हटकतात आणि ‘या परिसरात फिरायचे नाही,’ असे बजावितात. पोलीस इतके जागरूक असतानाही चोरटय़ांनी संधी कशी साधली? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.