प्रेयसीच्या कानाखाली मारू शकत नसाल, तर ते नातं नव्हेच! ‘कबीर सिंग’च्या दिग्दर्शकाचं वादग्रस्त वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

शाहीद कपूर अभिनित कबीर सिंग हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. आतापर्यंत 218 कोटींचा गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटाच्या निर्मात्यांना 300 कोटींच्या मॅजिकल फिगरमध्ये जाण्याच्या अपेक्षा आहेत. पण, दुसरीकडे कबीर सिंगवर कडाडून टीकाही होताना दिसत आहे. अत्यंत पुरुषसत्ताक केंद्रित विचारसरणीचा चित्रपट म्हणून टीकाकार कबीर सिंग चित्रपटाचा चांगलाच समाचार घेतला आहे.

दुसरीकडे चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वांगा यांनी चित्रपटावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.  इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, वांगा म्हणाले की, जेव्हा तुम्ही प्रेमात आकंठ बुडालेले असता तेव्हा त्या व्यक्तिला (प्रेयसी किंवा प्रियकर) कानाखाली मारण्याचं स्वातंत्र्यही तुम्हाला असलं पाहिजे. जर ते नसेल तर प्रेमाला काहीही अर्थ नाही, असं वांगा यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे. या चित्रपटाचा मूळ चित्रपट अर्जुन रेड्डी जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी चित्रपटाचे अनेक पैलू पाहिले पण कबीर सिंगच्या बाबतीत फक्त स्त्रीवादी बाजूच पुढे येताना दिसत आहे, असंही वांगा यांचं म्हणणं आहे.

या चित्रपटात कबीर त्याची प्रेयसी प्रीती हिला कानाखाली मारताना दिसत आहे. त्या प्रसंगाबाबत सांगताना वांगा म्हणतात की, प्रीतीसुद्धा कबीरला मारते. पण, तिच्याकडे मारण्याचं काहीही कारण नाही. उलट कबीरकडे प्रीतीला मारण्याचं कारण आहे. जर तुम्ही तुमच्या प्रेयसीला कानाखाली मारू शकणार नसाल, तर त्या नात्यात भावना नाहीत, असं वादग्रस्त वक्तव्य वांगा यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.