
सांगलीतील शिंदेमळा, कालानागर, बायपास रोड परिसरात सापडलेल्या 15 अनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेश महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रशासनाला दिला आहे. तर, कर्तव्यात कसूर करणाऱ्या त्या भागातील सीनियर पाइप इन्स्पेक्टरला निलंबित करण्यात आले आहे. मनराज साळुंखे असे निलंबित पाइप इन्स्पेक्टरचे नाव आहे.
आयुक्त नितीन कापडणीस यांनी आज महापालिकेतील आपल्या दालनात पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. बैठकीला उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, पाणीपुरवठा अभियंता सुनील पाटील, पाणीपुरवठा अधीक्षक उज्ज्वला शिंदे, अप्पा अलकुडे आदी उपस्थित होते. यावेळी महापालिका क्षेत्रातील नळ कनेक्शनबाबतचा आढावा आयुक्त कापडणीस यांनी घेतला.
मागील काही दिवसांत मनपाकडे नोंद नसणारी अनेक बेकायदेशीर नळ कनेक्शन्सची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली आहे. याबाबतही कापडणीस यांनी कायदेशीर कारवाईचा आदेश दिला आहे. ज्या भागात 15 नळ कनेक्शन्स विनापरवाना आढळून आली आहेत, त्या भागातील वरिष्ठ पाइप निरीक्षक मनराज साळुंखे यांना याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्याचा आदेश त्यांनी दिला. विनापरवाना नळ कनेक्शन वापरणाऱ्या त्या 15 ग्राहकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेशही आयुक्त कापडणीस यांनी दिला.
दरम्यान, यापुढे ज्या भागात अनधिकृत किंवा बोगस नळकनेक्शन्स आढळून येतील, त्या भागाचा संबंधित पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला जबाबदार धरले जाईल, असा इशाराही आयुक्त कापडणीस यांनी दिला. पाणीपुरवठा बिलाबाबत नागरिकांनी दक्ष राहावे आणि महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात किंवा ऑनलाइन साइटवर पाणी बिले भरून रीतसर पावती घ्यावी. ज्यांच्या घरी नळ कनेक्शन आहे, मात्र त्यांना बिल येत नसेल, अशा ग्राहकांनी पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधून आपल्या बिलाबाबत चौकशी करावी. पाणी बिलापोटी कोणीही ग्राहकांनी कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नये आणि अशी रक्कम कोण मागत असेल, तर तत्काळ महापालिका पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.






























































