आरोपींना अटक करा; अन्यथा आत्मदहन करणार! दूधगंगा पंतसंस्था अपहार प्रकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, कर्जदार व जामीनदार यांच्या मालमत्ता जप्त होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन बेमुदत चालूच राहील. ठेवीदारांना योग्य न्याय न मिळाल्यास आत्मक्लेष आंदोलन व आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा दूधगंगा ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला.

संगमनेरसह नगर जिह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱया दूधगंगा सहकारी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आणि इतर आरोपींना अटक करावी, या प्रमुख मागणीसह ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने संगमनेरचे प्रांताधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन आणि उपोषण सुरू केले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांची विचारपूस केली.

दूधगंगा पतसंस्थेच्या या घोटाळ्यात 21 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी फक्त सहाच आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यातील काही आरोपी जामिनावर सुटले आहेत. परंतु, या घोटाळ्याचा मुख्य आरोपी आणि सूत्रधार पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे, त्याचे कुटुंबीय आणि उच्चभ्रू प्रतिष्ठत आरोपी अद्यापही फरार आहेत.

जोपर्यंत आरोपी भाऊसाहेब कुटे व त्याचे कुटुंबीय, चेतन नागराजबाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज, कृष्णराव कदम व त्यांचे कुटुंबीय, संदीप दगडू जरे या व उर्वरित आरोपींना अटक होत नाही, कर्जदार व जामीनदार यांच्या मालमत्ता जप्त होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन बेमुदत चालूच राहील. ठेवीदारांना योग्य न्याय न मिळाल्यास आत्मक्लेष आंदोलन व आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा दूधगंगा ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला.

पोलिसांच्या तपासाबाबत नाराजी

दोन महिने होत आले तरी आरोपी पोलिसांना सापडलेले नाहीत. अनेकवेळा तक्रारी व आंदोलनाचा इशारा देऊनही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली नाही. आर्थिक गुन्हे शाखा नगर यांच्याकडे तपास असून, तपासात अद्यापर्यंत कोणतीही प्रगती झाल्याचे चित्र दिसत नाही. त्यामुळे या तपासाबाबत नेहमीच साशंकता व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या तपासाबाबत आणि वरिष्ठांच्या दुर्लक्षाबाबत ठेवीदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

लोकप्रतिनिधींकडून दखल

या आंदोलनाची दखल घेत शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आंदोलकांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. खासदार लोखंडे यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी, तालुका उपनिबंधक यांना संपर्क साधून सर्व आरोपी, कर्जदार आणि जामीनदारांवर प्रशासकीय कारवाई करून ठेवी परत करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष ऍड. श्रीराम गणपुले उपस्थित होते. छावा ब्रिगेडचे संस्थापक-अध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनीही आंदोलकांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.