संगीत शिवस्वराज्यगाथा! 42 नवगीतांमधून साकारले संगीतमय शिवचरित्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेते-दिग्दर्शक विनय आपटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली म्हणून सईशा फाऊंडेशन मुंबई प्रस्तुत ‘संगीत शिवस्वराज्य गाथा’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 42 नवगीतांमधून साकारलेला ऐतिहासिक सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘संगीत शिवस्वराज्य गाथा’विषयीचे मनोगतसुद्धा चलचित्राच्या सहाय्याने दाखवले जाणार आहे. 7 डिसेंबर रोजी विलेपार्ले पूर्व येथील लोकमान्य सेवा संघ येथे सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

विनय आपटे यांच्या आवाजाने अनेकांना मोहिनी घातली. या श्रेष्ठ कलाकाराचे शिवचरित्राबद्दल असलेले नितांत प्रेम, श्रद्धा सर्वश्रुत आहे आणि म्हणूनच त्यांनी याच भारदस्त आवाजात या कार्यक्रमातील शिवगीतांसाठी आपल्या आवाजाच्या विशेष शैलीत जणू ‘छत्रपती शिवाजी महाराजच’ आपले मनोगत सांगत आहेत अशा पद्धतीनेच याचे निवेदन केलेले आहे. याच भारदस्त आवाजातील ध्वनिफितींसह हा विशेष कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रनिर्मितीच्या उद्देशाने केलेल्या या खास ध्वनिफितींमध्ये शिवचरित्राचा महान संदेश तर दडलेला आहेच, पण त्यासोबत धगधगत्या नवगीतांच्या सादरीकरणातून आणि भालजी पेंढारकर प्रतिष्ठानच्या सहकार्याने भालजींच्या चित्रपटांच्या अखंड चलचित्रांच्या सहाय्याने हा विशेष कार्यक्रम समस्त शिवभक्तांना व श्रोत्यांना साडेतीनशे वर्षे इतिहासात घेऊन जाईल यात कोणतीही शंका नाही.

गायक केतन पटवर्धन, दत्तात्रय मेस्त्र्ााr, दीप्ती आंबेकर आणि अनिल नलावडे ही नवगीते सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन, सूत्रसंचालन पद्मश्री राव करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.