
सांगली शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील डी-मार्टच्या मागील बाजूस आढळलेला कोल्हा वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करून ताब्यात घेतला. बिबटय़ानंतर आता शहरात कोल्हा दिसून आल्याने खळबळ उडाली. वन विभागाने तत्काळ धाव घेत कारवाई केली. शंभर फुटी रस्त्यावरील डी-मार्टच्या मागील बाजूस एक कोल्हा असल्याची माहिती एका सामाजिक कार्यकर्त्यास मिळाली. त्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ खात्री करण्यात आली. तो कोल्हा असल्याचे समोर आल्यानंतर तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले. वन विभागात नेत त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तो सुरक्षित असल्याची खात्री करून निसर्गात मुक्त करण्यात आले. मात्र, गेल्या आठवडय़ात शहरात बिबटय़ा आढळला होता. त्यानंतर आता कोल्हा आढळल्यामुळे खळबळ उडाली. वनक्षेत्रपाल सर्जेराव सोनवडेकर, वनसेवक सचिन साळुंखे, वनपाल सुधीर सोनवले, चालक भारत भोसले, प्राणिमित्र मंदार शिंपी, मेघदीप कुदळे, रोहन हर्षद, नीलेश पाथरवट, राहुल घोरपडे यांचा रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभाग होता.



























































